बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिवाजी महाले यांच्यासारखे देशभक्त सैनिक स्वराज्याचे अनमोल रत्न आहेत. मात्र शिवरायांना ‘शिवा’ व जिवाजींना ‘जीवा’ असे एकेरी म्हणणारे इतिहासकार कलम कसायापेक्षा कमी नाहीत. ते शिवरायांवर वार करणार्यास कृष्णाजी संबोधतात, तर होता जीवा म्हणून वाचला शिवा, असा एकेरी उल्लेख करतात. हा खेळ थांबलेला नाही. इतिहासाचे विकृत लेखन तेव्हापासून आजही तसेच सुरू असल्याचे प्रतिपादन बारा बलुतेदार महासंघाचे नेते दामोदर बिडवे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांचे पुण्यसमरण समितीच्या कार्यालयात १४ जानेवारी रोजी पार पडले. यावेळी बिडवे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले होते तर समितीचे पदसिद्ध सचिव सुनील सपकाळ, माजी अध्यक्ष पत्रकार रंजीतसिंग राजपूत, प्राचार्य डी आर माळी, गणेश निकम केळवदकर, तुषार काचकुरे, रवींद्र सूर्यवंशी, गजानन झगडे, प्रकाश सुरडकर, उत्तमराव बाजड, के.वो. बावस्कर, डॉक्टर विजय खोलाडे, श्रीकृष्ण शेळके आदींची उपस्थिती होत.
पुढे बोलताना बिडवे म्हणाले, की इतिहास काळापासून शिवरायांच्या इतिहासावर कलम कसाई अन्याय करीत आले आहे. ते काम आजही थांबले नाही. जिवाजी महाले यांनी दिलेले अमूल्य योगदानाची योग्य दखल घेतली गेली नाही. तरी ते जनतेच्या हृदयात कोरले गेले आहे. जिवाजी महाले यांच्यासारखे सवंगडी स्वराज्याचे अनमोल रत्न आहेत. त्यांचे अमूल्य योगदानाणे स्वराज्य साकारले तर अठरापगड जाती जमातींना घेऊन जाणारे शिवराय खरे समाज पुरुष आहेत, असे ते म्हणाले. यावेळी सुनील सपकाळ यांनी शिवरायांचा इतिहास व त्यांना मिळालेले जिवाजी सारख्या सवंगड्यांची साथ यावर मौलिक प्रकाश टाकला. प्रास्ताविक रवी पाटील यांनी केले. यावेळी जीवाजी महाले यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.
अत्यंत कठीण प्रसंगी जीवाची बाजी लावून लढणारे जिवाजी महाले, तानाजी मालुसरे असे सवंगडी व त्यांना घडविणारे शिवराय देश व समाज उभारणीतील आदर्श आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोली यांनी केले. यावेळेस त्यांनी जिवाजी महाले यांच्या कार्याची माहिती दिली. आदर्श समाज निर्मितीसाठी शिव विचारांची आजही नितांत गरज असल्याची डॉक्टर शोन म्हणाले.
—————-