विक्रमाचे सर्व विक्रम मोडले, हिवर्यात लाखोंची महापंगत; विवेकानंदांच्या जयघोषात वागेभाजी-पुरीचे महाप्रसाद सेवन!
– सर्वपक्षीय नेते राजकीय वैर विसरून विवेकानंद नगरीत जनता जनार्धनासमोर प्रथमच एकत्र!
हिवरा आश्रम, जि. बुलढाणा (संतोष थोरहाते/ रवींद्र सुरूशे) – राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या तब्बल एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त आयोजित महापंगतीचा आज (दि.१४) लाभ घेतला. महाप्रसाद घेण्यापूर्वी लाखो भाविकांच्या मुखातून निघालेल्या स्वामी विवेकानंद की जय… भारत माता की जय… पू. शुकदास महाराज की जय… या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. तब्बल ५४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची शनिवारी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान तब्बल लाखो भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. या महापंगतीने सामूहिक महाप्रसाद सेवनाचा लाभ घेणार्या भाविकांच्या गर्दीचा स्वतःचाच विक्रम मोडित काढला.
सामूहिक शिस्तीची भक्ती दाखवित ४० एकराच्या परिसरात एकाचवेळी ५३ पंगती बसल्या होत्या. तब्बल १०१ ट्रॅक्टरद्वारे व तीन हजार स्वयंसेवकांनी महाप्रसाद वितरणात सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे, कोणतीही अस्वच्छता न करता ही महापंगत उठली. सर्व भाविकांचे विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कुंकूम-चंदन तिलक लावून, धूपआरती ओवाळून पूजन केले. यावेळी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, माजी मंत्री तथा आ. राजेंद्र शिंगणे, आ.डॉ.संजय रायमूलकर, माजी आ.राहुल बोंद्रे यांच्यावतीने त्यांच्या पत्नी वृषालीताई बोंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गट नेता आशीष रहाटे, शिवसेना (ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, निंबाजी पांडव, किशोर गारोळे, ह.भ.प.प्रकाशबुवा जवंजाळ, माजी जि.प.सदस्य संजय वडतकर, वसंतराव मगर, भास्करराव काळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवदास रिंढे, सि. मा. ठेंग, ताठे, व्हि.टी.गाभणे, माजी.पं.स.सदस्य शेषराव काळे, जेष्ठ पत्रकार सिध्देश्वर पवार, प्रमोद रायमूलकर, दत्ता खरात, सभापती दिलीपबापू देशमुख, प्राचार्य कैलास बियाणी, प्राचार्य पागोरे तथा आदि उपस्थित होते.
महाप्रसाद स्थळावरील मनोर्यावरुन वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांचे बहारदार सूत्रसंचलन सुरु होते. त्यांनी शंखध्वनीसह केलेल्या स्वामी विवेकानंद व पू. शुकदास महाराज यांच्या जयनाम घोषाने आसमंत अक्षरशः निनादून गेला होता.
लाखो भाविकांच्या मुखातून हा जयघोष उमटला होता. महापंगतीच्या सुरुवातीस विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाविकांचे पूजन करून त्यांना कुंकूम-चंदन तिलक लावला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते भाविकांना पुरी-भाजीचा प्रसाद वाटप करून महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली. शिस्तबद्धपणे या लक्षावधी भाविकांनी भावपूर्ण वातावरणात हा महाप्रसाद सेवन केला. विवेकानंद आश्रमाचे आजी-माजी विश्वस्त, पदाधिकारी यांनी सोहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अतिशय शिस्तबद्ध, डोळ्याची पारने फेडणारा नयनरम्य सोहळा अतिशय आनंदात उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. विवेकानंद जन्मोत्सवासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने ४ अधिकारी ५० पोलीस कर्मचारी, १० महिला पोलीस, १ दंगा काबू पथक, वाहतूक नियंत्रक पथक, पोलीस कर्मचारी व सहाय्यक पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. भाविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने साखरखेर्डा पोलीस स्टेशनची नवनिर्वाचित ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कित्येक भाविकांना परतावे लागले महाप्रसादाविना..
राज्यभरातून लाखो भाविकांची मांदियाळी स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवासाठी हिवरा आश्रम तालुका मेहकर येथे होती. या लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये शिस्त,शांतता पाहायला मिळाली. पण काही भाविकांची निराशा सुद्धा झाली. कारण शेवटच्या भक्तांपर्यंत महाप्रसाद पोहोचलाच नाही. कित्येक पंक्तीतील ट्रॅक्टर हे पंक्तीच्या शेवटी आल्यानंतर त्यातील महाप्रसाद संपलेला होता. त्यामुळे कित्येक भाविक महाप्रसादाविनाच रिकाम्या हाती घरी परतले. त्यामध्ये चूक कोणाची? श्रद्धास्थान म्हणून आलेल्या भाविकांची की, आश्रमच्या पंच कमिटीची, की अजून महाप्रसाद वाटप करणाऱ्या स्वयंसेवकांची. असा प्रश्न भाविकांना पडला आहे. मोठ्या आशेने आलेल्या भाविकांना पुढील वर्षी महाप्रसाद मिळालाच पाहिजे असे मत भाविकांकडून व्यक्त होत आहे.