लाखो भाविकाच्या उपस्थित ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेचा अक्षता सोहळा
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिध्देश्वर यात्रेच्या दुसर्या दिवशी सिध्देश्वर मंदिर व तलाव परिसरात संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने अक्षता सोहळा भक्तिमय व मंगलमय वातावरणात झाला.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेवर निर्बंध आले होते. त्यामुळे यात्रा ठराविक भाविकांच्या उपस्थितीत करावी लागली होती. परंतु यंदा लाखो भाविकांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेमध्ये विशेष म्हणजे बाराबंदीचे पोषाक घातलेले भक्ताने लक्ष वेधून घेतले होते. अक्षता प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना बसवराज शास्त्री हिरेमट यांनी आपल्या वाणीने मंत्रमुग्न केले. अक्षता सोहळप्रसंगी भर उन्हात लाखो भाविकांची उपस्थिती होती. दोन वाजून पंधरा मिनिटांनी अक्षता सोहळा झाला. अक्षता सोहळा प्रसंगी काट्याचे आगमन बरोबर दुपारी एक वाजून ३० मिनिटांनी झाले. त्यानंतर अक्षता सोहळा झाला. त्यानंतर मोठ्या उत्साहात भाविकांनी आलेल्या मार्गावरून घरी परतले. विशेष म्हणजे अक्षता सोहळा सर्व भक्तांना पाहता यावे यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात होता. त्यामुळे ही यात्रा अतिशय शांततेच्या मार्गाने झाली.
नऊशे वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेनुसार चालत आलेल्या या यात्रेतील अक्षता सोहळा नेत्रांमध्ये साठवताना प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंदाची व धन्यतेची भावना दिसून आली. अक्षता सोहळा संपन्न होताच सिध्देश्वर महाराजांच्या जय-जयकाराने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. बाराव्या शतकात श्रमाला प्रतिष्ठा देत व सामाजिक सुधारणा करीत, सोलापुरात वास्तव्य केलेले ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या प्रत्यक्ष आयुष्यात घटनांवर आधारित दरवर्षी ही यात्रा भरते. योगीपुरूष सिध्देश्वर महाराजांची भक्ती करीत, त्यांच्याबरोबरच विवाह करण्याचा हट्ट एका कुंभार कन्येने धरला होता. तिला कितीही समजावून सांगितले तरी तिने आपला हट्ट कायम ठेवला होता. शेवटी सिध्देश्वर महाराजांनी त्या कुंभार कन्येला आपल्या योग दंडाबरोबर विवाह करण्याची अट घातली. ही अट आनंदाने मान्य करीत ती सौंदर्यवती कुंभार कन्या सिध्देश्वरचरणी लीन होऊन विवाह बध्द झाली.
यात्रेच्या दुसर्या दिवशी तिने अग्निप्रवेश केला, अशी आख्यायिका सांगितली जाते. सिध्देश्वर महाराजांच्या या अद्भुत विवाह सोहळ्यावर आधारित सिध्देश्वर यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सिध्देश्वर महाराजांनी आपल्या कार्यकाळात सोलापूरच्या पंचक्रोशीत प्रतिष्ठापना केलेल्या ६८ शिवलिंगांना तैलाभिषेक (यण्णीमज्जन) करून विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. त्यानुसार यात्रेच्या पहिल्या दिवशी सिध्देश्वर महाराजांच्या योगदंडासह सात उंच नंदीध्वजांचा भव्य मिरवणूक सोहळा होऊन सर्व ६८ शिवलिंगांना प्रदक्षिणा घातली गेली.
या अक्षदा सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेचे आयुक्त शितल तेली उगले, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, बाजार समितीचे संचालक केदार उबरंजे, संचालक अमर पाटील, प्रकाश वाले यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होते.
आपत्कालीन व्यवस्थेचा अभाव
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रे प्रसंगी शनिवारी लाखो भाविक अक्षता सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. अक्षदा संपल्यानंतर अचानक एका लहान मुलाला व मुलीला चक्कर आली. परंतु त्याप्रसंगी या अक्षता सोहळ्याप्रसंगी कोणत्याही प्रकारचे आपत्कालीन व्यवस्था नसल्यामुळे मोठा गोंधळ मोडला आणि सुदैवाने अनर्थ घटना टळली.
——————