Breaking newsHead linesKhandesh

नाशिक पदवीधर मतदारसंघात प्रचंड चुरश, शुभांगी पाटील यांना शिवसेनेचा पाठिंबा!

– सत्यजीत तांबेंना पाठिंबा देण्यास काँग्रेसचा नकार, शुभांगी पाटलांनी केली भाजपची गोची!

नाशिक (जिल्हा प्रतिनिधी) – नाशिक पदवीधर मतदारसंघात काहीतरी वेगळेच शिजत आहे, असे मी अगोदरच बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते. मात्र त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने भाचे सत्यजीत याच्या बंडखोरीला थोरातांचे तर समर्थन नाही ना, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दुसरीकडे, सत्यजीत यांना भाजप पाठिंबा देण्याची दाट शक्यता पाहाता, अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील – सूर्यवंशी यांनी ‘मातोश्री’शी संपर्क साधला. आज झालेल्या बैठकीत पाटील यांना शिवसेना (ठाकरे) यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांना आता महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला आहे. भाजपकडून शुभांगी पाटील – सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचे कबुल करण्यात आले होते. मात्र, ती मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचे ठरवले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. पाटील या आता ठाकरे गटाच्या उमेदवार असणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांनी दिली. या निवडणुकीची जबाबदारी आमच्यावर सोपविण्यात आली असून, आम्ही ती चोखपणे पार पाडू, असेही बागूल यांनी सांगितले.

काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवणुकीत दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारी अर्जावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. पवार म्हणाले, ‘दोन-तीन दिवसांआधी कानावर येत होतं. त्यावेळी मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो की, असं काहीतरी कानावर ऐकू येतंय. तुम्ही काळजी घ्या. तुम्ही बघा, काही वेगळं शिजतंय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरातांना आदल्या दिवशी सांगितलेलं होतं’. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘तुम्ही काळजी करु नका. आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही व्यवस्थित पार पाडू. उद्या डॉक्टर तांबे यांचाच फॉर्म भरला जाईल.’ परंतु, अजित पवार यांनी सूचना केली त्याकडे दुर्लक्ष करणे थोरातांना भोवले. त्यांच्या सख्ख्या भाचाने बंडखोरी केली असून, त्याला थोरातांचा मूक पाठिंबा असावा, असा संशय आता निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही, असा दावा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला होता. तसेच महाविकास आघाडीकडून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही. त्यांनी पक्षाला फसविले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता निर्माण झालेली आहे. याबाबत आज मातोश्रीवर रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी एक व्हिडिओ प्रसारीत करुन त्यांची भूमिका मांडली. ‘महाविकास आघाडीने आपला अधिकृ उमेदवार निश्चित केला होता. त्यांना एबी फॉर्मदेखील दिला. तसेच भाजपकडून दोन जणांना उमेदवारी मिळेल, असे सांगण्यात येत होते. त्यातही शुभांगीताई तुम्हाला एबी फॉर्म देऊन असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले. मात्र दुपारी अडीच वाजता काँग्रेसच्या नेत्याने स्वतःचा अर्ज न भरता स्वतःच्या मुलाचा अपक्ष अर्ज भरला. एवढी नाट्यमय घडामोड कधीही नाशिक पदवीधर निवडणुकीत घडली नव्हती. विचित्र राजकारणाला आपण सामोरे जात आहोत. सामान्य घरातल्या मुलीने राजकारणात पुढे येऊच नये, असे काहींना वाटत आहे. राजाचा मुलगा राजा नाही बनणार. ज्याच्यामध्ये कसब आहे, तोच राजा बनणार. संपूर्ण महाराष्ट्राला माझे कर्तृत्व माहीत आहे. भाजपकडे मी अनेक दिवसांपासून उमेदवारी मागत होते. भाजपनेही माझे काम मान्य केले होते. पण राजाच्या मुलाला राजा बनविण्यासाठी माझे बलिदान देण्यात येत आहे. पण माझ्यासाठी माझे पदवीधर बांधव, डॉक्टर, शिक्षक यांनी घरोघरी जाऊन अर्ज भरले आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक लढविणारच’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.


कोण आहेत शुभांगी पाटील? 

ॲड. शुभांगीताई पाटील – सूर्यवंशी या  नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात एकमेव महिला उमेदवार आहेत. त्या  महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा आहेत. शुभांगी पाटील आता अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत. त्यांनी महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यांना एबी फॉर्म दिला गेला नाही.


नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर फडणवीस यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं. बघत राहा. परिस्थितीवर नजर ठेवा. योग्यवेळी योग्य गोष्टी कळतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उमेदवार शुभांगी पाटील या मातोश्रीवर गेल्या आहेत. त्यांना ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ठिक आहे. योग्यवेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!