Breaking newsHead linesMaharashtraMumbai

भावाच्या काळजीपोटी बहीण दवाखान्यात; पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. सद्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गंभीर जखमी भावाच्या भेटीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या आज धावून गेल्यात. या भेटीदरम्यान पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच काळजी घेण्याची सूचना केली.

राजकीय पटलावर एकमेकांवर आसूड ओढणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे संकटकाळात एकमेकांच्या सोबत असतात याची पुन्हा प्रचिती आली. पंकजा मुंडे आज भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला ब्रीच कॅण्डीत दाखल झाल्या. या भेटीनंतर बोलताना त्या म्हणाल्या की, आज तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आले होते. त्यांची तब्येत बरी आहे. मी बहीण आहे आणि मागेदेखील धनंजय मुंडे अ‍ॅडमिट होते. तेव्हा मी भेटायला आली होती. मी तर बहीण आहे आणि सर्वच राजकीय नेतेमंडळी एकमेकांना भेटतात ही राजकीय संस्कृती आहे, असे त्या म्हणाल्या. बुधवारी रात्री साडेसात वाजता पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या भेटीकरिता ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचल्या. त्यांनी भावाची आस्थेने विचारपूस करुन फार दगदग करु नकोस. तब्येतीला जप… असा आपुलकीचा सल्लाही दिला. तसेच अपघात कसा घडला याची सविस्तर माहितीही घेतली. सुमारे अर्धा तास बहीण भावामध्ये दिलखुलास गप्पाही रंगल्या. ‘काही लागलं तर कळव…’ म्हणत पंकजांनी धनंजय मुंडे यांचा निरोप घेतला.

गेल्या आठवड्यात परळीत धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला होता. परळीत प्राथमिक उपचार करुन त्यानंतर त्यांना मुंबईतल्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवड्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यादरम्यान विविध राजकीय नेते त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत आहेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच डॉक्टरांनाही सूचना केल्या. त्यानंतर आज पंकजाताईंनी आपले बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली.

धनंजय मुंडे यांना अपघाताच्या दुसर्‍या दिवशी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. अजित पवार यांनी यावेळी त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांचीदेखील भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना माहिती दिली होती.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!