Head linesPolitical NewsPoliticsVidharbha

विधानपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार; अमरावती, नाशिक मतदारसंघ काँग्रेसला सोडले!

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – विधानपरिषदेच्या आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आज दिली. या निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. बैठकीला जयंत पाटील यांच्यासह आ. जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. अमरावती आणि नाशिक मतदारसंघात काँग्रेसचे, कोकणात शेतकरी कामगार पक्षाचे, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तर नागपुरच्या मतदारसंघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडणुक लढवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

अमरावती विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून धीरज लिंगाडे यांचे नाव निश्चित झाले तर नाशिकमधून काँग्रेसचेच सुधीर तांबे पदवीधर मतदारसंघातून रिंगणात आहेत. सुरूवातीला नागपूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यास काँग्रेस तयार नव्हती, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झाला होता. एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. आम्ही एक पाऊल जरी मागे आलो असलो तरी आम्ही विचारधारेच्या विरोधात आहोत, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

दुसरीकडे, भाजप-शिंदे गटही विधानपरिषदेच्या जागा एकत्र लढणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारांची घोषणा केली. कोकण विधानपरिषदेकरीता ज्ञानेश्वर म्हात्रे, पश्चिम विदर्भातून रणजीत पाटील आणि मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिकबद्दलचा निर्णयाची अजून घोषणा झालेली नाही, तर नागपूरमध्ये भाजपप्रणित ना. गो. गणार हे लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!