विवेकानंद आश्रमाचे उध्वर्यु, विश्वस्त, माजी उपाध्यक्ष सुखदेव मानघाले (दादा) समाधीस्थ
हिवरा आश्रम, ता. मेहकर – निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराज यांच्या सेवायज्ञात आपल्या आयुष्याची आहुती देणारे, आणि विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यासाठी आयुष्यभर झिजलेले निस्सीम सेवाव्रती व विवेकानंद आश्रमाचे उर्ध्वयु, माजी उपाध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ विश्वस्त सुखदेव रामचंद्र मानघाले (दादा) यांची आज दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहकर येथील शेजुळ हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर संन्यासधर्माप्रमाणे सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास समाधीविधी करण्यात आला. साखरखेर्डा येथील पलसिद्ध मठाचे मठाधीपती स्वामी जयदीप व वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांच्या नेतृत्वात हा समाधीविधी पार पडला. यावेळी शेकडोंचा जनसमुदाय हळहळला होता. दादांच्या निर्वाणाने विवेकानंद आश्रम परिवारावर शोककळा पसरली आहे. निर्वाणप्रसंगी ते ८८ वर्षांचे होते. दादांच्या निर्वाणामुळे हिवरा आश्रम येथील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
विवेकानंद आश्रमाच्या उभारणीत सुखदेव रामचंद्र मानघाले उपाख्य दादा यांचा सिंहाचा वाटा होता. पूर्वाश्रमीचे पोलिस अधिकारी राहिलेले दादा हे निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज यांच्या अपघातानेच सानिध्यात आले. पोलिस दलात सेवा देताना मानसिक धक्का बसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी धिप्पाड देहयष्टीच्या दादांना महाराजश्रींकडे सुपूर्त केले होते. शुकदास महाराजांनी त्यांच्यावर वैद्यकीय व अध्यात्मिक उपचार करून त्यांना मानसिक आजारातून मुक्त केले. त्यानंतर दादांनी संसाराकडे परत न जाता संन्यस्त जीवनशैलीचा अंगीकार केला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन विवेकानंद आश्रम व शुकदास महाराजश्रींच्या सेवेसाठी शब्दशः दान केले. ते लौकिकार्थाने संसारी पुरूष होते, परंतु अध्यात्मात उंची गाठलेले विरक्त संन्याशी महापुरूषही ते होते. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि शुकदास महाराजश्री यांच्या कार्य व विचारांचा त्यांच्यावर प्रचंड पगडा होता. विवेकानंद आश्रमाच्या उभारणीत त्यांनी अमूल्य असा वाटा उचलला. ते प्रदीर्घकाळ विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष राहिलेत. अलीकडेच शरीर थकले तरी ते आश्रमाच्या नियोजन, प्रकल्प अमलबजावणी व व्यवस्थापन यात आपले मार्गदर्शन ते देत होते. सद्या ते आश्रमाचे विश्वस्त तसेच मुख्य मार्गदर्शक होते. दादांनी आपले आयुष्यच नाही तर संपूर्ण संपत्तीही विवेकानंद आश्रमाला दान दिली होती.
मागील सात वर्षांपूर्वी निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजश्री यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर मानघालेदादा काहीसे अस्वस्थ झाले होते. तसेच, वयोमानाप्रमाणे त्यांचे शरीरही थकले होते. अध्यात्मिक उंची गाठलेली असल्याने त्यांना काही ईश्वरीय साक्षात्कार तसेच अदृश्यातील शुकदास महाराजश्रींच्या दर्शनाचाही लाभ होत होता. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे मेहकर येथील शेजुळ हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. परंतु, थकलेले शरीर औषधोपचाराला साथ देत नसल्याने या विरक्त महापुरूषाने आज दुपारी चार वाजेच्या सुमारास निर्वाणावस्था प्राप्त केली. त्यांच्या पार्थिवावर साखरखेर्डा येथील पलसिद्ध मठाचे स्वामी जयदीप यांनी संन्यासधर्मानुसार जागृत शिवमंदीर असलेल्या हरिहरतीर्थावर समाधीविधी केला. तर त्यांना सहाय्य वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांनी केले. यावेळी पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष पू. आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत, तनशीराम पाटील मानघाले, सरपंच रतन पाटील मानघाले, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र धोंडगे, आमदारपुत्र नीरज रायमुलकर यांच्यासह विवेकानंद आश्रमाच्या विश्वस्त मंडळाने पितृतुल्य अशा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दादांचा निर्जीव देह चीरसमाधीत पोहोचताच उपस्थित जनसमुदाय हळहळला, अनेकांना आपले अश्रु अनावर झाले होते. विविध राजकीय नेते, पदाधिकारी व समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करून विवेकानंद आश्रम परिवार व मानघाले परिवाराचे सांत्वन केले आहे.
——————