– शिंदे गावाच्या उपसरपंचपदी संदीप बंगाळे, रानअंत्रीच्या उपसरपंचपदी सौ. दीपाली खरात बिनविरोध
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – आदर्शगाव म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव सोनार येथे निवडून आलेल्या एकाच पॅनलच्या सदस्यांत उपसरपंचपदाच्या नावावर एकमत न झाल्याने निवडणूक वेळेत एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद हे रिक्त असल्याने निवडणूक पीठासीन अधिकारी यांनी जाहीर केले.
सविस्तर असे, की सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव सोनार येथील ग्रामपंचायत आठ विरुद्ध शून्य असे निवडून येऊनसुद्धा पिपळगाव सोनार येथे आज (दि.०६) उपसरपंचपदाची निवडणूक लावली होती. ग्रामसेवक आर. डी. शेळके व निवडणूक अधिकारी सोळंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस देऊन बोलावले होते. परंतु ग्राम पिंपळगाव सोनारा येथे ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी एकही अर्ज वेळेत आला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सचिव व निवडणूक अधिकारी सोळंके यांनी उपसरपंचाचे पद रिक्त आहे, असे जाहीर केले.
सदर ग्रामपंचायतमध्ये सरपंच व इतर सात सदस्य एकच पॅनलचे असून, त्यांचे उपसरपंच पदासाठी एक मत न झाल्यामुळे उपसरपंच पदाचे एकही उमेदवार वेळेत ग्रामपंचायतमध्ये अर्ज भरण्यासाठी आला नाही. ग्रामपंचायत पिंपळगाव सोनारा हे एक आदर्श गाव म्हणून जिल्ह्यात नावलौकिक आहे. तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदे येथे उपसरपंच संदीप विष्णू बंगाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. चिखली तालुक्यातील रानअंत्री येथे सरपंच तात्याराव झाल्टे यांनी तर आज बिनविरोध निवडून आलेले उपसरपंच सौ. दीपाली खरात यांनी ग्रामपंचायत रानअंत्री येथील ग्रामपंचायतचा कारभार सुरू केला आहे.