अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे शानदार उद्घाटन
कर्जत (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्तीच्या स्पर्धेकरिता भारत देशभरातील एकूण १३० विद्यापीठातील कुस्ती संघ स्पर्धेकरिता आलेले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना दादा पाटील महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. या स्पर्धेचे ध्वजारोहण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे व आमदार रोहितदादा पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी हवेत फुगे सोडण्यात आले. या स्पर्धेतील सर्व उपस्थितांचे स्वागत संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राजेंद्र फाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेचे निरीक्षक डॉ. राजेंद्र खत्री यांनी दादा पाटील महाविद्यालयाने आयोजन केलेल्या संपूर्ण स्पर्धेच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे निमंत्रक आमदार रोहित पवार यांनी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कर्जतच्या इतिहासात व विद्यापीठाच्या इतिहासातही कॉलेज पातळीवर अशा स्पर्धा प्रथमच कर्जतमध्ये होत आहेत. स्पर्धा होत असलेल्या मॅटभोवती राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. या प्रतिमा म्हणजे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. ‘राष्ट्र को राह दिखाती, महाराष्ट्र की शक्ती’ अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत. सर्व महिला कुस्ती खेळाडूंना प्रेरणा मिळावी याकरिताच हे फलक लावण्यात आले आहेत. भारतातून आलेल्या प्रत्येक खेळाडूने या स्त्री शक्तीच्या इतिहासाचे अवलोकन करावे असे आवाहन केले. रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील कॉलेजमध्ये या कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहेत. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी नेहमीच महिलांच्या उध्दाराकरिता परिश्रम घेतले, धोरणे आखली. त्याचाच परिपाक म्हणजे महिलांकरिता महाराष्ट्रामध्ये पहिला महिला आयोग आणला. नंतर तो देशात लागू झाला. संरक्षण खात्यामध्ये महिलांना संधी दिली. महिलांसाठी आरक्षण ठेवण्याची भूमिका प्रथम त्यांनी घेतली. त्यांच्याच भूमिकेला अनुसरून ही स्पर्धा संपन्न होत आहे.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे उद्घाटक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी कर्जत सारख्या निमशहरी ग्रामीण भागात ही भव्यदिव्य स्पर्धा आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कुस्ती या प्रकारानेच भारताला पहिल्यांदा ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून दिले होते. भविष्यात अशा महिलांच्या कुस्ती स्पर्धा देशभर संपन्न होतील. कर्जत येथे संपन्न होत असलेल्या कुस्ती स्पर्धेतून अनेक पालक प्रेरणा घेवून, आपल्या मुलीला कुस्तीगीर बनवण्याची तयारी करतील असा आशावाद व्यक्त केला. भविष्यातील अनेक ऑलिंपिकपटू अशा स्पर्धेतून भारताला मिळतील अशी इच्छाही व्यक्त केली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी देशभरातून आलेल्या महिला कुस्तीपटू कोच, रेफरी, महाविद्यालयातील सर्व सेवकवर्ग व बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होते. या स्पर्धेचे आभार दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी व्यक्त केले. या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. राम काळे, प्रा. रोहिणी साळवे, प्रा. स्वप्निल मस्के यांनी केले.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दीपक माने, सहाय्यक क्रीडा संचालक डॉ.दत्ता महादम, अंबादास पिसाळ, राजेंद्र निंबाळकर, बप्पाजी धांडे, नगराध्यक्षा सौ.उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, मधुकर कन्हेरकर, मधुकरआबा राळेभात, सूर्यकांत मोरे, बाळासाहेब साळुंखे, सुभाषचंद्र तनपुरे, शरद शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच कर्जत येथील सामाजिक संघटनेचे सदस्य, कर्जत तालुक्यातील पत्रकार, माजी विद्यार्थी संघ, कर्जत जामखेड तालुका क्रीडा संघटना, नगरपंचायत कर्जत, रोटरी क्लब कर्जत यांचे सदस्य उपस्थित होते.