भाजप आमदाराकडे ड्रायव्हर राहिलेल्या अमोल धामोडेने १७ वर्षीय मुलगी पळवल्याचा गंभीर आरोप!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जळगाव जामोद तालुक्यातील एका गावातीन १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला भाजप आमदाराकडे ड्रायव्हर राहिलेल्या अमोल धामोडे यांने अपहरण करून पळवून नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, तसा आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केला आहे. १ ऑक्टोबर २०२२ रोजी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होऊनही मुलीचा शोध न लागल्याने, या प्रकरणात संबंधित आमदाराचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही मुलीच्या पालकांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, या मुलीच्या जीवाचे काही तरी बरेवाईट झाले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
जळगाव जामोद शहरातून अमोल धामोडे नावाच्या वाहन चालकाने एका १७ वर्षीय एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेल्याबाबत १ ऑक्टोबर २०२२ रोजी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. परंतु, तीन महिने झाले तरी मुलीचा शोध लागलेला नाही. तसेच, आमदाराकडे वाहन चालक राहिलेल्या अमोल धामोडे याचादेखील पोलिसांना शोध लागलेला नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाजपा आमदाराच्या वाहन चालकाने हे अपहरण केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयाने केल्यानंतर राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. दरम्यान, पोलिसांवर आमदाराचा दबाव असल्याचा आरोप करत, मुलीच्या शोधासाठी अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. परंतु, या उपोषणाची दखल देखील पोलिस व प्रशासकीय यंत्रणेने घेतलेली नाही. मुलीचा शोध न घेण्यासाठी आमदार पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोपही मुलीच्या कुटुंबीयांनी केलेला आहे.
दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी वाहन चालकाने अल्पवयीन मुलीच्या केलेल्या अपहरण व त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत संबंधित आमदारांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले. तसेच, आता हा वाहन चालक नोकरी सोडून गेला आहे. त्याबाबतीत पोलिस तपास करत आहेत, असे सांगितले.
काय म्हणाले, पीडित मुलीचे कुटुंबीय?
मुलीच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की ज्या दिवशी माझ्या मुलीच अपहरण झाले, अगदी त्याच्या काहीवेळआधी मला भाजप आमदार यांनी आपल्या बंगल्यावर बोलावून ‘माझ्या ड्रायव्हर व तुमच्या मुलीच काहीतरी आहे आणि त्यांचं काहीही होऊ शकतं…! ‘ अस सांगितले होते. त्यानंतर मी घरी आलो तर इकडे माझी मुलगी गायब झालेली आढळली, त्यामुळे या प्रकरणात आमदाराचा हात असल्याचा गंभीर आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
या घटनेप्रकरणी जळगाव जामाेद पाेलिस ठाण्यात भादविंच्या 363 कलमान्वये गुन्हा दाखल असून, आमचा तपास सुरू आहे. आरोपी हा आमदाराचा ड्रायव्हर असल्याबाबत माहिती नाही. लवकरच आरोपीला शोधून काढले जाईल, अशी माहिती जळगाव जामोद पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश झांबरे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना दिली.