Head linesPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsSangali

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघासाठी गोपीचंद पडळकरांची जोरदार ‘फिल्डिंग’!

सांगली (संकेतराज बने) – सध्या सत्तेत असणार्‍या शिंदे गटाच्या खानापूर-आटपाडी विधानसभेच्या जागेवर आपणच लढणार असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदाराची जागा पडळकरांना सोडणार का, हा प्रश्न निर्माण झाला असून, त्याचीच राजकीय चर्चा तालुक्यात रंगत आहे.

सध्या शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या खानापूर-आटपाडी मतदारसंघात २०२४ साली भाजपचाच आमदार असणार, अशी घोषणा गोपीचंद पडळकरांनी केली आहे. शिंदे गटाचे आमदार असलेल्या अनिल बाबर यांच्याऐवजी आपणच निवडणूक लढवणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. २०१९ साली गोपीचंद पडळकरांनी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांविरोधात निवडणूक लढवली होती. बारामतीत पडळकरांचे डिपॉझिट जप्त झाले होते. पण ही निवडणूक आपण फक्त वरिष्ठांच्या आदेशामुळेच लढवल्याचंही पडळकरांनी सांगितले.

२०१४ साली पडळकरांनी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनिल बाबर यांना ७२ हजार ८४९, काँग्रेसच्या सदाशिव पाटील यांना ५३ हजार ०५२ तर गोपीचंद पडळकर यांना ४४ हजार ४१९ मते मिळाली होती. पडळकरांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक सांगलीतून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढवली. या निवडणुकीत भाजपच्या संजयकाका पाटील यांना ५ लाख ८ हजार ९९५ मते मिळाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर उभे राहिलेल्या विशाल पाटील यांना ३ लाख ४४ हजार ६४३, तर वंचित आघाडीकडून उभे राहिलेल्या पडळकरांना ३ लाख २३४ मते मिळाली. पण २०१९ ची विधानसभा मात्र पडळकरांना खानापूर-आटपाडीऐवजी बारामतीतून लढवावी लागली.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्यासोबतचा एकही आमदार पडणार नाही, अशी घोषणा केली आहे. आणि आता पडळकरांनी मात्र अनिल बाबरांऐवजी आपणच आमदार होणार असल्याचा दावा केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पडळकरांनी केलेल्या या दाव्यावर आमदार अनिल बाबर बोलायला तयार नाहीत. २०२४ ची लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढणार असल्याची घोषणा भाजप आणि शिंदे गटाने केली. पण या निवडणुकीत शिंदे गटाच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार? जागावाटपाचे गणित कसे सोडवणार? आणि बंडखोरी कशी रोखणार? हेच प्रश्न शिंदे आणि फडणवीस यांच्यासमोर असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!