Breaking newsBULDHANAChikhaliHead linesMaharashtraWorld update

कापसाचे दर घसरले, शेतकरी चिंतेत!

– कापसाचे आयातशुल्क हटविण्यासाठी कॉटन असोसिएशनचा केंद्र सरकारवर दबाव, कोरोनाच्या अतिरंजित बातम्या शेतकर्‍यांच्या मुळावर उठल्या?

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – कॉटन असोसिएशनने कापूस आयातीवर असलेले ११ टक्के आयातशुल्क हटविण्याची केलेली मागणी, वायदे बाजारात कापसाचे घसरलेले दर आणि कोरोनाबाबत प्रसारमाध्यमांतून सातत्याने येणार्‍या नकारात्मक बातम्या, व राज्य आणि केंद्र सरकारच्या हालचाली यामुळे राज्यातील कापसाचे दर गेल्या १० दिवसांत तब्बल दीड हजार रुपयाने उतरले असून, कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. मागील आठवड्यात ९ ते साडेनऊ हजार रुपयांवर असलेले दर आता चक्क सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटलवर आलेले आहे. केंद्र सरकारने कापसाचे आयातशुल्क हटविण्याचा निर्णय घेतला तर हे दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे. तूर्त तरी आयातशुल्क हटविण्यासाठी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्र सरकारवर जोरदार दबाव निर्माण केलेला आहे. त्यामुळे वायदे बाजारातदेखील भाव थंडावलेले आहेत. ‘उत्पादन खर्चाइतकादेखील दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालेले असून, विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा पुन्हा उद्रेक हाेण्याची भीती निर्माण झालेली आहे.’

महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कापसाचे भाव ५०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले असून, कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली असली तरी, कापूस दरावर पुढील काही दिवस दबाव राहू शकतो. मात्र जानेवारीच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात दरात सुधारणा होऊ शकते, अशा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. गेल्या १० दिवसांमध्ये बुलढाणा, अकोला व नजीकच्या जळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. कापसाचे दर हे नऊ हजार रुपयांवरुन ७ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपयांवर आले आहेत. विशेष म्हणजे, शेतकर्‍यांनी विक्रीसाठी कापूस बाजारात आणलेला नसतानाही गेल्या दहा दिवसात कापसाच्या दरात एवढी घसरण झाली आहे. देऊळगावराजा बाजार समितीत काल ३०० क्विंटल कापसाची आवक झाली, तेथे ७४०० ते ७५७५ इतका प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तर आखाडा बाळापूर, वर्धा या भागात कापसाला ८००० चा भाव चालू होता. तर मागील आठवड्यात हाच कापूस देऊळगावराजा येथे ८५४० ते ८५७५ रुपये क्विंटल दराने खरेदी केला जात होता. तर सोयाबीन मेहकरमध्ये ५६५० ते ५१५० व चिखलीमध्ये ५६७० ते ५३९५ रुपये क्विंटलदराने खरेदी केले जात होते. देऊळगावराजा येथे ५२०० ते ५००० रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला आहे.
मागील वर्षी कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना कापसाला कधी नव्हे तर ते १२ हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा देखील शेतकर्‍यांना ही वाढ मिळेल, अशी अपेक्षा होती. ही अपेक्ष़ा सद्या फोल ठरली आहे.
कालपासून वायद्यांमध्ये कापूस दर कमी झाल्यानंतर बाजार समित्यांमध्येही दरात नरमाई पाहायला मिळाली. सोमवारी कापूस दरात क्विंटलमागे सरासरी ५०० ते १३०० रुपये घट झाली होती. मात्र मंगळवारी कापूस दर स्थिरावले. तर काही बाजारांमध्ये कापूस दरात वाढ पाहायला मिळाली. देशातील बाजारांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर राज्यातील बाजारांमध्ये सरासरी दरपातळी ७ हजार ६०० ते ८ हजार ३०० रुपये होती.


गरज नसेल तर कापूस विकू नका – जाणकारांचा सल्ला

शेतकर्‍यांनी घाबरून न जाता ‘पॅनिक सेलिंग’ (घाबरून जाऊन विक्री) टाळावे. शेतकर्‍यांनी ८ हजारांच्या कमी दरात कापूस विक्री करू नये. गरजेपुरता कापूस विकून शक्य असल्यास दर वाढेपर्यंत वाट पाहणेच सध्याच्या परिस्थितीत फायदेशीर ठरेल, असे आवाहन जाणकारांनी केले. चीनमध्ये कोरोना वाढल्याच्या बातम्यांचाही परिणाम बाजारावर जाणवत असल्याचे सांगितले जाते. चीन कापसाचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने त्याच्या मागणीचा आंतरराष्ट्रीय बाजार आणि पर्यायाने देशातील बाजारावरही परिणाम होतो. भारतातदेखील केंद्र व राज्य सरकारे कोरोनाच्या बाबतीत उगीचच बाऊ करत आहेत. त्यात काही प्रसारमाध्यमेदेखील आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. तसेच, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या दबावाखाली केंद्र सरकार कापसावरील आयातशुल्क हटविण्याचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे कापसाच्या दरात घसरण होत आहे. शेतकर्‍यांनी गरज नसेल तर कापसाची विक्री करू नये, असा सल्ला जाणकारांनी दिलेला आहे.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!