अजितदादा, नाथाभाऊ मैदानात; भाजप पाचवी जागा गमाविणार?
– राज्यसभेची पुनर्रावृत्ती करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न भंगणार!
– भाजपची सहा मते फोडण्यासाठी जबरदस्त रणनीती
मुंबई (खास प्रतिनिधी) – विधानपरिषद निवडणुकीत राज्यसभा निवडणुकीची पुनर्रावृत्ती करण्याची खूणगाठ बांधलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्या (दि.२०)च्या विधानपरिषद निवडणुकीत जबरदस्त धक्का बसण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहाही जागा जिंकून आणण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मैदानात उतरले असून, त्यांनी धक्कादायक खेळी रचत, मतांची जुळवाजुळव केली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. त्यामुळे भाजपची पाचवी जागा धोक्यात असून, अपक्षांच्या मदतीने काँग्रेसही दुसरी जागा जिंकेल, असे राजकीय चित्र आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी आता काही तास उरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या निर्देशावरून अगदी शेवटच्याक्षणी सक्रीय झाले. विरारमध्ये जात त्यांनी अपक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूर यांचे चिरंजीव व आमदार क्षीतिज ठाकूर हे अमेरिकेत आहे. तेही उद्या मतदानाला पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, बहुजन विकास आघाडीची दोन मते मात्र निश्चित आहे. या शिवाय, नाथाभाऊंनी आणखी तीन मतांची गोळाबेरीज केली असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले.
विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी २७ मतांची गरज आहे. राज्यसभेप्रमाणे मतदान झाले तर भाजपकडे १२३ संख्याबळ आहे. परंतु, अजित पवार व एकनाथ खडसे यांनी यातील सहा मते पुन्हा महाआघाडीकडे वळविली आहेत. त्यामुळे भाजपकडे फक्त ११७ मते उरतात. त्यामुळे भाजपचे चारच उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपचा पाचवा उमेदवारच धोक्यात आला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६७ इतके संख्याबळ सद्यातरी दिसते आहे. त्यामुळे तिघांच्याही प्रत्येकी दोन जागा निवडून येणार आहेत, असे वरिष्ठ राजकीय सूत्राने स्पष्ट केले.
भाजपची मते फुटणार?
देवेंद्र फडणवीस यांना धक्का देण्यासाठी एकनाथ खडसे यांनी मास्टर प्लॅनिंग केले असून, त्यामुळे हादरलेल्या फडणवीस यांनी भाजप आमदारांना हॉटेलमध्ये ठेवत, तेथेच तळ ठोकला आहे. काही लहान पक्ष आणि अपक्ष आमदार यांना गाठत, खडसे यांनी फडणवीस यांचे मतांचे गणित बिघडवून टाकले आहे. अशा खेळ्यांत खडसे हे फडणवीस यांचे गुरु आहेत, तेही फडणवीस यांनाही चांगलेच माहिती आहे. भाजपमधील नाराज गटही नाथाभाऊंना अप्रत्यक्ष सहकार्य करत असल्याचे वरिष्ठ राजकीय सूत्राने सांगितले.