रस्तेदुरूस्तीच्या ज्वलंत प्रश्नांतूनच आ. नीलेश लंकेची ‘दक्षिणे’तील राजकीय पकड मजबूत!
– नगर दक्षिणेतील खराब रस्तेच सुजय विखेंची खासदारकी घालवणार?
पुरूषोत्तम सांगळे
नगर/मुंबई – तब्बल साडेचारशेपेक्षा जास्त बळी घेणार्या, आणि राजकीय उदासीनतेचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील महामार्ग व रस्त्यांच्या दुरूस्तीकडे झालेल्या गंभीर दुर्लक्षाकडे, केंद्र व राज्यातील सत्ताधार्यांचे लक्ष वेधण्यासाठी पारनेर-नगरचे आमदार नीलेश लंके यांनी प्राणांतिक उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या उपोषणाला नगर दक्षिणेतून जोरदार जनसमर्थन प्राप्त होत असून, रस्त्यांसारख्या गंभीर प्रश्नाची सोडवणूक करण्यात अपयश आलेल्या खासदार सुजय विखेंविरोधात संतापाची लाटही निर्माण होऊ लागली आहे. नगर-पाथर्डी-शेवगाव रस्ता, नगर-राहुरी-शिर्डी-कोपरगाव रस्ता आणि नगर-मिरजगाव-चापडगाव-टेंभुर्णी रस्ता या जिल्ह्यातील चारही प्रमुख रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आ. लंके यांचे उपोषण असले तरी, या उपोषणातून त्यांनी दक्षिणेतील खासदारकी आजच पक्की केली असून, त्यांचे आजचे उपोषण सुजय विखेंची खासदारकी घालविणारे ब्रम्हास्त्र ठरणार आहे. हे उपोषण जितके दिवस चालेल, तितका जनतेच्या मनात असलेला संताप लाव्हारसासारखा उफळून बाहेर येईल. आज गावे बंद होत आहे, टायर जाळले जात आहेत, अधिकार्यांच्या खुर्च्या पेटविल्या जात आहेत, उद्या निष्क्रिय ठरलेल्या नेत्यांचे पुतळेही संतप्त जनता जाळल्याशिवाय राहणार नाही.
स्वभावाने शिवसैनिक असलेले परंतु आजरोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार असलेले नीलेश लंके हे कोरोना काळात केलेल्या रूग्णसेवेमुळे देशभरात चर्चेत आलेले आहेत. नगर दक्षिण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. परंतु, या बालेकिल्ल्यात उत्तरेतील डॉ. सुजय विखे हे खासदार बनलेत. मोदी लाट आणि विखे यांनी अनेक वर्षांपासून केलेली राजकीय रणनीती यशस्वी होऊन ते दक्षिणेतून खासदार झालेत. त्यांच्या कार्यकाळात खराब रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा दक्षिणेतील जनतेला होती. परंतु, ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. या चारही मार्गावर जवळपास साडेचारशेपेक्षा जास्त बळी मागील काही वर्षात गेलेले आहेत. हे रस्ते म्हणजे नगरकरांच्या संयमाचा अंत पाहणारे ठरलेले आहेत. आजरोजी केंद्रात भाजपची सत्ता आहे, विखे पिता-पुत्र हे भाजपचे वजनदार नेते आहेत. इतके पॉवरफुल नेते असतानादेखील त्यांना या खराब रस्त्यांच्या दुरूस्तीचा प्रश्न का मार्गी लावता आला नाही? त्यामुळेच लोकांच्या संतप्त भावनांना वाचा फोडत, अखेर आ. नीलेश लंके यांनी उपोषणास्त्र बाहेर काढले. गेल्या तीन दिवसांपासून ते उपोषण करत आहेत, आजरोजी त्यांचे दोन किलो वजन कमी झाले असून, त्यांना अशक्तपणा जाणवू लागला आहे. तरीदेखील राज्य किंवा केंद्र सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे दक्षिणेत संतापाची लाट उसळत आहे. अनेक गावे स्वतःहून बंद होत आहेत. लोकं रस्त्यांवर उतरून आंदोलने करत आहेत. रस्ते रोखले जात असून, दिवसेंदिवस उपोषण मंडपात विविध सामाजिक संघटना व लोकांची गर्दी वाढत आहे. जितके दिवस हे उपोषण लांबेल, तितकी खासदार विखेंविषयी लोकांत संतापाची लाट पसरत जाईल. आज टायर जाळले गेले, उद्या काही नेत्यांचे पुतळेही फुंकले जातील.
आमदार लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटलेले होते. तीन दिवस उलटूनही प्रशासनाने नीलेश लंके यांच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने तातडीने प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पण तीन दिवसांपासून उपाशीपोटी असलेल्या लेकराला त्या दोन घास भरवू शकल्या नाहीत. आई-वडिलांना लेकरांची काळजी असते, त्यामुळे एक आई म्हणून त्या आ. लंके यांच्या भेटीला आल्यात. या माऊलींच्या डाेळ्यात उपाशीपाेटी लेकराला पाहून आलेले आश्रू अनेक लेकरांचे रस्त्यावर सांडणारे रक्त थांबविणारे ठराेत. लंके यांच्या घरीदेखील कुणाला अन्न गोड लागत नाही. परंतु, ज्या खराब रस्त्यांमुळे अनेक मातांचे लेकरं त्यांना सोडून गेलीत, त्यांचे दुःख निवारणासाठी आणि भविष्यात अनेक लेकरांचे जीव वाचविण्यासाठी आजचे हे उपोषण गरजेचे आहे. खराब रस्त्यांवरून आ. लंके यांचे उपोषण हा केवळ संताप नाही तर लोकभावनेचा तो उद्रेक आहे. या लोकभावनेची सरकारने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. वणवा पेटण्याआधीच तो विझवला जाणे गरजेचे आहे. कारण, आता लोकं संतप्त प्रतिक्रिया द्यायचे लागले आहेत.
आज पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे टायर जाळले गेले. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असले तरी, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया निर्माण होत आहेत. पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या उपअभियंत्यांची खुर्ची अज्ञात नागरिकांनी जाळली, ही घटना त्याचेच द्योतक आहे. काल पाथर्डी, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा, नगर तालुक्यात अनेक गावे बंद ठेवण्यात आली. आज करंजी, टाकळी ढोकेश्वर, पारनेर, चिचोंडी पाटील, आरणगाव येथे रस्ता रोको करून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. भाजप व शिंदे गट सोडला तर सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी नीलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्यासोबत काही संघटनादेखील उपोषणाला बसलेल्या आहेत. ज्या मातीत थोर गांधीवादी अण्णा हजारे यांच्यासारखे नेतृत्व जन्माला आले, त्याच मातीतून नीलेश लंके हे नेतृत्वदेखील जन्माला आलेले आहे. त्यामुळे मागण्या मान्य होत नाही, आणि लोकांचे बळी जाणे थांबत नाही, तोपर्यंत ते आपले आंदोलन थांबविणार नाही. आणि जितके दिवस त्यांचे आंदोलन चालेल, तितके दिवस ते दक्षिणेतील घराघरात जाऊन पोहोचतील. त्यामुळे नीलेश लंके यांच्या खराब रस्त्यांसाठीचे उपोषण हे नगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे यांच्यासाठी पुढील निवडणुकीत खासदारकी घालविणारे ठरणारे आहे. लोकसभेच्या मैदानात पुढील सामना हा सुजय विखेविरुद्ध नीलेश लंके असाच होणार आहे. लंके हे गोरगरीब लोकांचे सेनापती आहेत. फाटक्या झोळीचा हा नेता उद्या एका सर्वच बाबतीत पॉवरफुल्ल असलेल्या शक्तीसमोर उभा ठाकणार आहे. खराब रस्त्यांवर जाणारे बळी रोखले जातील, तीच त्यांची खरी मतांची बिदागी ठरणार आहे. त्यामुळे आजचे उपोषण हे सत्ताधारी मग ते राज्यातील असो, की केंद्रातील त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरणारे आहे.