अलंकापुरीत कार्तिकी यात्रेस हैबतबाबा पायरी पूजनाने प्रारंभ
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी माउलींच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातील श्रींचे संजीवन समाधी सोहळ्याला श्रीगुरु हैबतबाबा यांचे पायरी पूजनाने हरिनाम गजरात उत्साहात सुरुवात झाली. यावेळी राज्यातून आलेले भाविक आळंदीत उपस्थित होते. दरम्यान राज्यातून विविध संतांच्या दिंड्या जयघोष करीत दाखल झाल्या. दिंड्यानी प्रदक्षणा करीत मुक्कामाचे ठिकाण गाठले. माउली नाम गजरात हैबतबाबा पायरी पूजन, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप, दिंडीची मंदिर प्रदक्षिणा तसेच सोहळ्याचे परंपरेप्रमाणे नित्यनैमित्तिक धार्मिक कार्यक्रम झाले.
यावेळी हैबतबाबा यांचे प्रतिनिधी वंशज पालखी सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरफळकर यांचे हस्ते पायरी पूजन करण्यात आले. या प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर यांनी पायरी पूजन प्रसंगी मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला. या निमित्त आरती, महानैवेद्य वाढविण्यात आला. वेदमंत्र जयघोषत पूजेचे पौरोहित्य अमोल गांधी, पप्पू कुलकर्णी, यशोदीप जोशी यांनी केले. यावेळी दूध, दही, पंचामृत, मध, अत्तर, साखर, पुष्पहार, लक्षवेधी तुळशीहार, श्रींचे बागेतील फुले अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, माजी आमदार रामभाऊ मोझे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, मंगेश आरु, स्वप्निल कुऱ्हाडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, माजी विरोधी पक्षनेते डी.डी. भोसले पाटील, थोरल्या पादुका देवस्थानचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, पो.नाईक मच्छिंद्र शेंडे, ज्ञानेश्वर गुळूंजकर, दिलीप महाराज ठाकरे, मारुती महाराज कोकाटे, विशेष कार्यकारी अधिकारी संकेत वाघमारे, संजय रणदिवे चोपदार, सुदीप गरुड, गौरव सदानंद, विठ्ठल घुंडरे, भिमाजी घुंडरे यांचेसह वारकरी भाविक, आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
सोहळ्याचे प्रारंभ दिनी प्रथम मंदिरात पहाटे घंटानाद, पावमान अभिषेख झाला. त्यानंतर पायरी पूजन हैबतबाबा यांचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. श्री गुरु हैबतबाबा यांचे ओवरीत पूजा, मानकरी यांना नारळ प्रसाद, देवस्थान तर्फे पूजा व महाप्रसाद वाटप उत्साहात झाले. यानिमित्त माउली मंदिराचे महाद्वार लक्षवेधी फुलांनी सजविण्यात आले होते. यावर्षी आळंदी देवस्थानने भाविकांच्या वतीने आलेल्या सुचनां प्रमाणे आळंदी मंदिरावर लक्षवेधी आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर तसेच इंद्रायणी नदी घाटावर देहू आळंदी परिसर विकास समितीचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड यांचे माध्यमातून देखील लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. येथे सहिष्णुतता सप्ताह हरिनाम गजरात सुरु झाला आहे.
मंदिरात अभिषेक, दुधारती , महापूजा , महानैवेध्य , योगीराज ठाकूर यांचे वतीने कीर्तन, धुपारती, बाबासाहेब आजरेकर याचे तर्फे कीर्तन , हैबतरावबाबा पायरी समोर बाबासाहेब आजरेकर, वासकर महाराज तसेच ह.भ.प.हैबतबाबा आरफळकर यांचे वतीने परंपरेने जागर सेवा आदी धार्मिक कार्यक्रम झाले. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी यात्रेसाठी भाविकांच्या सेवा सुविधांना प्राधान्य देत नियोजन केले आहे. यात्रा काळात भाविकांचे आरोग्य व सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले असून भाविक, नागरिक यांनीही आपआपल्या आरोग्य सुरक्षिततेसाठी गर्दीचे ठिकाणी तसेच शहरात वावरतांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
पंढरपूर येथून श्री नामदेवराय पादुका पालखी सोहळा तसेच श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचे अलंकापुरीत आगमन झाले. स्वकं सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष सुनील तापकीर, आशा तापकीर, सुभाष बोराटे आदी मान्यवरांनी आळंदी देहू फाटा येथे सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी दिंडीतील विणेकरी यांचा सत्कार करण्यात आला. सोहळ्यातील पदाधिकारी , दिंडी प्रमुख यांचे स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा प्रमुख नामदेव महाराज वासकर, प्रभू महाराज वासकर,ऋषिकेश महाराज वासकर, दिंडी प्रमुख पांडुरंग महाराज बोरुंडे आदींचा सत्कार व स्वागत आळंदीत करण्यात आले.
शुक्रवार ( दि. १८ ) आळंदी मंदिरात सोहळ्यात पहाटे घंटानाद, पवमान, अभिषेख, दुधारती, आळंदी देवस्थान तर्फे होणार आहे. दुपारी महानैवेद्य, विना मंडपात ह.भ.प. बाबासाहेब देहूकर, वासकर महाराज यांचे वतीने परंपरेने कीर्तन सेवा रुजू होणार आहे. देवस्थान तर्फे धूपारती होईल असे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. माउली मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम तसेच श्रींचे दर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत असल्याने भाविकांनी या सेवा सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रवर्तक श्रीगुरू हैबतराव बाबा यांच्या पायरी पूजनाने आळंदी कार्तिकी यात्रेस राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. टाळ, विना, मृदंगाच्या गजरात कार्तिकी यात्रेत हरीनामाचा गाजर सुरु झाला असून आळंदीत भक्ती रसाचा महापूर आला आहे.
आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावरील वास्कर महाराज यांच्या मंदिरात संत तुकाराम महाराज यांचे अवतार मल्लप्पा वासकर महाराज यांचे समाधीची पूजा आळंदी देवस्थानचे विश्वस्त अँड विकास ढगे पाटील, थोरल्या पादुका देवस्थानचे अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर, दादा महाराज वासकर, वासकर परिवार यांचे प्रमुख उपस्थितीत पूजा अभिषेक करण्यात आला. आळंदी मंदिरास तीन किलो चांदी भेट देण्यात आली. माऊली भक्त संतोष कदम परिवार यांचे वतीने देवस्थानला तीन किलो चांदी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अँड विकास ढगे पाटील यांचे उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. यावेळी दात्यांचा सत्कार आळंदी देवस्थानचे वतीने करण्यात आला. यावेळी पुजारी राजाभाऊ चौधरी, श्रीधर सरनाईक आदी उपस्थित होते.