– हल्लेखोर बुलढाण्याहून चारचाकीने आले, खुनी हल्ला करून पळून गेले!
– बुलढाण्याचे राजकारण आता एकमेकांच्या जीवावर उठले!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाण्याचे राजकारण आता एकमेकांच्या जीवावर उठले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मेहकर तालुकाप्रमुखांवरील प्राणघातक हल्ल्याची घटना विस्मरणात जात नाही तोच, आता मोताळा तालुकाप्रमुखांसह युवा सेनेच्या उपजिल्हाप्रमुखांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोर हे बुलढाण्याहून पाठलाग करत आले होते. बुलढाणा-मोताळा मार्गावरील मूर्ती फाट्यावर या दोघांची दुचाकी अडवून, त्यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला चढविला. परंतु, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या दोघांचे प्राण वाचले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नेहमीप्रमाणे अज्ञात आरोपींचा तपास सुरू आहे. यातील दिवाणे यांची प्रकृती गंभीर आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची चिखली येथे २६ नोव्हेंबरला विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या नियोजनासाठी आज बुलढाणा येथील जांभरून रोडवरील जनशिक्षण संस्थेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे तालुका प्रमुख व प्रमुख पदाधिकारी हे हजर होते. मोताळा तालुकाप्रमुख अनंता दिवाणे (वय ४५, रा. शिरवा, ता. मोताळा) व युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख शुभम घोंगटे (वय २५) हे दोघे आपल्या दुचाकीने बुलढाणा येथे बैठकीसाठी आले होते. ही बैठक संपल्यानंतर ते दुचाकीने मोताळ्याकडे जात असताना, एका अज्ञात चारचाकी गाडीने त्यांचा पाठलाग सुरु केला. दरम्यान, मूर्ती फाट्याजवळ या चारचाकी गाडीने त्यांची दुचाकी अडविली व त्यातून उतरलेल्या चौघा जणांनी या दोघांवर काही कळायच्याआत प्राणघातक हल्ला चढविला. या हल्लेखोरांनी तोंडावर रुमाल बांधलेला होता. लोखंडी रॉडसह इतर प्राणघातक हल्ला करून या चौघांनी या दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे दोघेही जीवाच्या आकांताने ओरडत शेजारील शेतात पळाले. त्यांचा आरडाओरड ऐकूण शेतकरी व ग्रामस्थ धावत आले, लोकं आल्याचे पाहून हल्लेखोर आपल्या चारचाकी गाडीतून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या दिवाणे व घोंगटे यांना ग्रामस्थांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, राजकीय वातावरण तापलेले आहे. हा हल्ला राजकीय सुडातून झाला असावा, असा संशय सर्वत्र व्यक्त होत असून, संपूर्ण जिल्ह्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या दिवाणे व घोंगटे यांचा जबाब नोंदविला असून, गुन्हे दाखल केले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत, जखमींची विचारपूस केली. जिल्हा रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांच्या मुसक्या आवळाव्यात अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिलेला आहे.