– वरली-मटका वाल्यांचीही चांदी सुरु – पोलिस आहेत कुठे?
– गावातून नियोजनबद्धपणे होते दारूची वाहतूक
चिखली (एकनाथ माळेकर) – दिवाळी, पाडवा सणांचा उत्साह खेड्यापाड्यात निर्माण होत असताना, या सणासुदीत खेड्यापाड्यांत गावठी व हातभट्टीच्या दारूविक्रीला ऊत आला आहे. शिवाय, वरली-मटका वाल्यांचाही धंदा जोरात व राजेरोसपणे सुरु असून, पोलिस यंत्रणा अस्तित्वात आहे, की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावठी व हातभट्टी दारूविरुद्धच्या कारवाया पोलिस व दारूबंदी विभागाने सातत्याने करणे अपेक्षित असताना, या कारवाया अचानक कशा काय मंदावल्या, याबाबत तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. गोपनीय सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, बीट जमादार पातळीवर सुरु होणारे कलेक्शन हे वरपर्यंत नियमित जात असल्याने, हे अवैध धंदे फोफावले असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चिखली तालुक्यात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात नेहमीच विकली जाणारी अवैध देशीदारू दिवाळी उत्सवाच्या काळातही अगदी नियोजनबद्ध पद्धतीने खेड्यापाड्यात विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खेडेगावतही अवैध दारू पोहोचविण्यासाठी सकाळ संध्याकाळ नियोजनबद्ध वाहतूक केल्या जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दिवाळी उत्सव शांततेत व उत्साहाच्या वातावरणात साजरा व्हावा, कुठेही कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये, यासाठी पोलिसांनी धडक पावले उचलून खेड्यापाड्यात सुरू असलेली गावठी व हातभट्टीची दारू विक्री तात्काळ बंद करावी, जेणेकरून दिवाळी उत्सव उत्साहात व आनंदात साजरा होईल. दोन वर्षापासून कोरोनाचे निर्बंध असल्याने कोणतेही सण-उत्सव साजरे करण्यात आले नाही. कोरोनाची परिस्थिती मागील काही महिन्यापासून कमी झाली असल्याने शासनाने नियमात शिथिलता दिली आहे, त्यामुळे सर्व जाती धर्माचे सण साजरे होताना दिसत आहे. तर सध्या दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली आहे, मात्र या दिवाळी उत्सवाच्या काळात खेडेगावांमध्ये दारू विक्री सुरु असल्याचे दुर्देवी चित्र आहे.
या अगोदरही नेहमीच खेडेगावात अवैध दारु विक्री होत असते, मात्र दिवाळी उत्सवाच्या काळात तरी अवैध दारू विक्री बंद राहील, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र ती अपेक्षासुद्धा भंग झाल्याचे चित्र काही खेडेगावातून दिसून येत आहे. कोरोनामुळे अगोदरच गोरगरीब मजुरांना ग्रामीण भागात कामे नाहीत. अनेक सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती कामानिमित्त फिरत आहेत. अशा परिस्थितीत खेडेगावात दारू विकल्या जात असल्याने युवा वर्गसुद्धा दारूच्या आहारी जात आहे. त्यामुळे बहुतांश घरात वादविवाद, भांडणे नेहमी सुरु आहेत. हा सर्व प्रकार प्रामीण भागात विकल्या जात असलेल्या गावठी व हातभट्टीच्या अवैध दारूमुळे होत आहे. सकाळ संध्याकाळ अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ग्रामीण भागात अवैध दारू पोहोचविल्या जाते. मात्र यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही, थातूरमातूर कारवाई करून एक ते दोन दिवसात सदर अवैध दारू व्यवसाय अगदी सुरळीतपणे सुरु राहतो, याला जबाबदार नेमका कोण हाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी अशा अवैध दारू विक्रेत्यावर ठोस कारवाई करून, दारूबंदीसाठी एक पथक नेमून, दिवाळी उत्सवाच्या काळात प्रामीण भागात विकल्या जाणारी दारू बंद करावी, अशी मागणी सर्व सामान्य जनतेमधून होत आहे.
विविध समित्या कागदावर!
ग्रामीण भागात शासन स्तरावरून विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. मात्र ह्या समित्या केवळ कागदपत्री असल्याचे दिसून येत आहे. पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यासह इतरही समित्या ग्रामीण भागात आहेत. मात्र या समितीचे अध्यक्ष नेमकी कोणती कामे करतात, हेच कळेनासे झाले आहे. आपल्या गावात अवैध दारू विक्री होत असतानाही त्यावर हे समिती अध्यक्ष बंदी का आणत नाही, असा प्रश्नही सध्या उपस्थित होत आहे. त्यामुळे ह्या समित्या गावातील अवैध धंदे बंद करू शकत नाही, अशा समित्या शासनाने बरखास्त कराव्यात, अशी मागणीसुद्धा जोर धरत आहे.
दारूबंदी विभागाचे होत आहे दुर्लक्ष!
शासनाच्या नियमानुसार, व ज्या दुकानाला दारूविक्रीचा परवाना दिलेला आहे, अशा ठिकाणी दारू विक्री व्हावी, यासाठी शासनाने दारुबंदी विभागसुद्धा तयार केलेला आहे. मात्र हा दारूबंदी विभाग नेमका कुठे व कोणती कारवाई करतो हेच कळेनासे झाले आहे. दारुबंदी विभागाने आतापर्यंत परिसरातील खेडेगावात ठोस कारवाई केली असे दिसून येत नाही. त्यामुळे जेवढी जबाबदारी पोलीस विभागाची आहे, तेवढीच जबाबदारी दारूबंदी विभागाचीसुद्धा आहे. त्यामुळे दारूबंदी विभागानेसुद्धा ग्रामीण भागात होत असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी होत आहे.
——————