BREAKING NEWS! मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा पकडला!
– लोणावळा पोलिसांनी केली अटक, गुप्तचर यंत्रणांनी सोडला सुटकेचा निःश्वास
पुणे (विशेष प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघाती स्फोटाद्वारे उडवून देण्याचा कट शिजत आहे, अशा प्रकारचा फोन करून मुख्यमंत्र्यांच्या हत्येची धमकी देणारा तरुण लोणावळा पोलिसांनी जेरबंद केला आहे. हा तरुण मूळचा आटपाडीचा राहणारा असून, केवळ धाब्याच्या मालकाला धडा शिकविण्यासाठी त्याने हा खटाटोप केला. कारण, धाबा मालकाने १० रुपयाची पाणी बॉटल १५ रुपयांना विकल्याचा त्याला राग आलेला होता. तरीही या तरुणाची पोलिस कसून चौकशी करत आहेत. अविनाश आप्पा वाघमारे (वय-३६, रा. रमाबाई आंबेडकर नगर, साठे चाळ, घाटकोपर, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहराचे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वायदंडे यांनी फिर्याद दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याच्या कटाची खोटी माहिती पोलिसांना देणार्या तरुणाला लोणावळा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने अटक केली आहे. अजय वाघमारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा आटपाडीचा रहिवासी आहे. वाघमारे हा मुंबईला जात असताना लोणावळ्यातील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला होता. या धाब्याच्या मालकाने त्याला दहा रुपयाची पाण्याची बॉटल पंधरा रुपयाला दिल्याने त्याचे डोके सरकले होते. या धाब्याच्या मालकाला कामाला लावण्यासाठी वाघमारे याने थेट सीएमच्या जीवे मारण्याच्या कटाबाबतचा पोलिसांना खोटा कॉल केला. पोलिसांना खोटी माहिती देऊन यंत्रणेची धावपळ उडवणार्या वाघमारेवर लोणावळा शहर पोलिसात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. पोलिस त्याच्याकडून कसून तपास करत आहेत.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.०२) दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत वळवन येथे असलेल्या हॉटेल साई कृपा (एनएच ४) येथे अविनाश वाघमारे याने दारूच्या नशेत हॉटेलचे मॅनेजर किशोर पाटील यांनी पाण्याचे बाटलीची किंमत जास्त लावल्याचा राग मनात धरून हॉटेल मॅनेजर व कर्मचारी यांना त्रास देण्याचे उद्देशाने आपल्या मोबाईल क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्षास १०० नंबरवर कॉल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा प्लॅन चालू आहे ही खोटी माहिती पसरवली. थेट राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली, यामुळे गुप्तचर यंत्रणाही अलर्ट झाल्या. शिंदे यांना यापूर्वीही नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. पत्र आणि फोनवरही धमक्या मिळाल्या होत्या.