पुण्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणाबाजी नाही; पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण!
पुणे (विशेष प्रतिनिधी) – पुण्यात काल PFI (पीएफआय)च्या प्रदर्शनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिल्या गेल्याचे वृत्त राज्यातील जबाबदार इंग्रजी, मराठी, हिंदी प्रसारमाध्यमांनी चालविले होते. एका जबाबदार वृत्तसंस्थेनेही खातरजमा न करता हे वृत्त दिल्याने ते देशभर प्रसारित झाले, व्हायरल झाले. या खातरजमा न झालेल्या, दिशाभूल करणार्या वृत्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिस यंत्रणांकडून योग्य माहिती घेऊन नेमके स्पष्टीकरण देण्याऐवजी तातडीने प्रतिक्रिया देऊन नाहक गैरसमज वाढविला. आता पुणे पोलिसांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ वैगेरे घोषणाबाजी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी ‘न्यूज लाँड्री’ या फॅक्ट चेक करणार्या जबाबदार माध्यम संस्थेला सांगितले की, पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ‘जिंदाबाद, जिंदाबाद, पॉपुलर फ्रंट जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केली. त्यात पाकिस्तानचा कुठेही, काहीही उल्लेख नव्हता. ‘कोणीही पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केली नाही. हे साफ खोटे आहे. पॉपुलर फ्रंट जिंदाबाद अशा घोषणा दिल्या गेल्या.’ बंड गार्डन पोलिस ठाण्यातील अन्य एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले, की ‘ही पूर्णतः बिनबुडाची बातमी आहे. काही चॅनेल्स आणि वृत्त माध्यमे शहरातील शांती आणि सद्भावाचे वातावरण बिघडावे म्हणून चुकीच्या बातम्या प्रसारित करत आहेत. आम्ही पूर्ण तपास केला आहे. प्रदर्शनकारी पाकिस्तानच्या नव्हे तर पॉपुलर फ्रंटच्या घोषणा देत होते.’
आता जर पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण खरे मानले तर, अशा बेजबाबदार न्यूज चॅनेल्स, वृत्त संस्था, वृत्त पत्रे, माध्यमे आणि खातरजमा न करता प्रतिक्रिया देऊन वातावरण बिघडवू पाहणार्या मंडळींवर गुन्हे दाखल करणार का? अशा संस्था, व्यक्तींवर धार्मिक सलोखा बिघडवणारी, देहाद्रोहाइतकीच कठोर कलमे लावायला हवीत. देशातील वातावरण हेतूत: बिघडवणे, हाही देशद्रोहच नव्हे का? अशा बेजबाबदार आणि बिनडोक माध्यमांचे करायचे काय? पीसीआय, आयबीएफ, बीसीसीसी वैगेरे संस्था काही करतील का? अशा चॅनेल्सचे लायसन्स रद्द करायला हवे आणि आरएनआयने अशा वृत्तपत्रांचे टायटल गोठवायला हवे! दंगली माजवायच्या आहेत का यांना? आणि, राज्यकर्त्यांना तरी भान आहे का?, असा संताप या सर्व प्रकारांवर ज्येष्ठ संपादक तथा पत्रकार विक्रांत पाटील, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनी व्यक्त केलेला आहे.
परवानगी न घेता पीएफआयचे मोर्चा, निदर्शने आंदोलन झाले. मात्र, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा प्रकारच्या कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. अशा प्रकारची अफवा देखील कोणीही पसरवू नये!
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे
– सागर पाटील, पोलीस उपायुक्त, पुणे
पोलिस आयुक्त, उपयुक्त महोदय, आता अफवा पसरविणारे चॅनेल्स, वेब, वृत्तपत्रे, सर्व बेजबाबदार माध्यमे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा. धार्मिक तेढ पसरविण्याचा प्रयत्न, दंगल मजविण्याचा प्रयत्न असला हा बेजबाबदारपणा आणि नालायकपणा आहे. शहर आणि देश शांत, एकसंघ ठेवायचा असेल तर असल्या बेजबाबदार संपादकांना अटक करून तुरुंगात डांबण्याची वेळ आता आली आहे.
– विक्रांत पाटील, ज्येष्ठ संपादक तथा पत्रकार, जळगाव
——————