श्रींचा विदर्भातील मुक्काम आटोपला, मराठवाड्यात दाखल
– संत तुकाराम महाराजांचे २० तर माऊलींचे २१ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान
वाशिम/नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) – विठूरायाच्या भेटीला निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचा विदर्भातील शेवटचा मुक्काम आज सकाळी आटोपल्यानंतर दुपारी श्रींची पालखी भरपावसात मराठवाड्यात दाखल झाली. पालखीच्या स्वागतासाठी शेणगाव येथे भाविक व ग्रामस्थ आले होते. आमदार तानाजी मुटकुळेंनी श्रींचे मराठवाडानगरीत स्वागत केले. दरम्यान, आषाढी वारीसाठी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी येत्या २० जूनरोजी देहूतून तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी २१ जूनरोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
सन १९६८ पासून शेगाव येथून पंढरपूरला ७५० किलोमीटर पायी श्री संत गजानन महाराज यांची पालखी नेली जाते. आज दुपारी मराठवाड्यात पालखी दाखल होताच आमदार तानाजी मुटकुळेंनी उत्साहात स्वागत केले. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसातही भाविकांनी पंढरीची वाट सोडली नाही. करोना संकटाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच पालखी निघाली आहे.
वाशिम जिल्ह्याच्या रिसोड येथील विदर्भातील शेवटचा मुक्काम आटोपून श्रींच्या पालखीने मराठवाड्याकडे प्रस्थान ठेवले होते. या पालखीमध्ये ७०० पताकाधारी, भजनी आणि वारकरी सहभागी आहेत. वाशिम जिल्ह्यातील शेकडो भक्तांनी गजानन महाराजांच्या पालखीला मराठवाड्याच्या सीमेपर्यंत निरोप दिला. शेगांव येथून ६ जूनरोजी निघालेली ही पालखी येत्या ८ जुलैरोजी पंढरपूरला पोहोचणार आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांची व देहू येथून संत तुकोबांची पालख्याही लवकरच प्रस्थान करणार आहेत. या सर्व संतांना विठूरायाच्या दर्शनाची सालाबादाप्रमाणे आस लागली असून, आषाढी एकादशीला संतभार भूवैकुंठ पंढरपूर नगरीत दाखल होणार आहे.
—
संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊलींचेही लवकरच प्रस्थान
आषाढी वारीसाठी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी येत्या २० जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वर्षी तिथी-वाढ आहे. त्यामुळे संत तुकोबांच्या पालखीचा मुक्का इंदापूर आणि आंथुर्णे येथे असणार आहे. तिथीवाढीमुळे यंदा पालखीचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती पालखी सोहळा समितीने दिली आहे. कोरोना काळात पालखीला खंड पडल्याने दोन वर्षानंतर प्रथमच पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्तान ठेवणार आहे.