– येथील सफाई कामगार बुलढाण्यात ‘सीईओ’च्या बंगल्यावर करतो काम!
– शिपाई, सफाई कामगाराची पदेही रिक्त
चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच विविध समस्यांच्या विळख्यात पडून आजारी पडले आहे. या आरोग्य केंद्राला शिपाई, सफाई कामगारांची वाणवा असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून, इतकेच काय या आरोग्य केंद्राला बोर्डच नसल्याने नवीन लोकांना येथे आरोग्य केंद्र आहे, हेदेखील कळत नाही. येथील सफाई कामगार पगार या आरोग्य केंद्रातून घेतो परंतु काम बुलडाणा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या बंगल्यावर करत आहे. शिपायाच्या दोन जागा खाली आहेत, सफाई कामगाराची जागाही रिकामी आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राची अनियमितता व अनागोंदी कारभार आरोग्य विभाग व आरोग्यमंत्री दूर करणार आहे की नाही? हा प्रश्न आहे. तसेच, अंत्री खेडेकर येथील सफाई कामगार आपल्या बंगल्यावर वापरण्याचा अधिकार सीईओंना आहे का? असा संतप्त सवालही निर्माण झालेला आहे.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथे तीन शिपाई कामगार जागा आहे, पैकी एकच भरलेली आहे. दोन जागा खाली आहे. या ठिकाणी सफाई कामगाराच्या दोन जागा आहे, एक जागा येथे भरलेली आहे. परंतु, येथील सफाई कामगार हा सात वर्षापासून मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्या बंगल्यावर कामाला नेण्यात आलेला आहे. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्रा’ने दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला असता, माझी ड्युटी अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. परंतु, माझ्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आदेश असल्यामुळे मी बुलढाणा येथे कार्यरत आहे. शेख सादीक असे या सफाई कामगाराचे नाव आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लाईट गेली असता, कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. येथील इन्व्हर्टर धूळ खात पडलेले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागच्या महिन्यामध्ये ३२ हजार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी केला आहे. यावेळेस तर ते शस्त्रक्रिया करत असतानाच लाईन गेली होती, सुदैवाने लवकर आली. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना काहीही अडचण आली नाही. दुर्देवाने काही झाले असते तर काय?, असा सवाल निर्माण होतो. असलेले इन्व्हर्टर कधी दुरुस्त होणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
या आरोग्य केंद्रामध्ये बाह्य रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु पिण्याच्या पाण्याची टाकी अर्धी तुटलेली असून, पाणी वाया जाते व पक्षी व इतर प्राणी तेथे घाण करतात. तेच घाणेरडे पाणी पिण्याची वेळ रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर आली आहे. तसेच, येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. हे कॅमेरे लाईटवर असल्यामुळे लाईट गेली असता कॅमेरे बंद पडतात. तसेच आरोग्य केंद्रासमोरील कॅमेरा पंधरा दिवसापासून बंद अवस्थेमध्ये आहे. सदर सीसीटीव्हीचे काम ओपसा ऑफ कंपनी बुलढाणा यांच्याकडे आहे. परंतु कॅमेरे बंद असल्याची तक्रार आरोग्य कर्मचार्यांनी या कंपनीकडे केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. ब्रेकिंग महाराष्ट्रने यासंदर्भात कंपनीचे संचालक यांच्याशी संपर्क साधला असता, दोन दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील जो कॅमेरा बंद आहे तो चालू करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या आरोग्य केंद्रात साचलेल्या घाणीविषयी या केंद्राचे अधिकारी डॉक्टर बावस्कर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, सफाई कामगार नसल्यामुळे आम्ही बाहेरून सफाई कामगार बोलावून काम करून घेतो व आरकेएसमधून त्याचे पैसे देतो, असे त्यांनी सांगितले. म्हणजे, स्वतःचा सफाई कामगार सीईओच्या बंगल्यावर काम करतो आणि खासगी कामगाराला सरकारचा पैसा द्यावा लागत आहे. तसेच, पाण्याची टाकी लवकरात लवकर दुरुस्त करून घेऊ, असेही डॉ. बावस्कर यांनी सांगितले आहे. आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी मशीनदेखील बंद पडलेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, हे प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेर्डा- मेरा खुर्द रोडवर आहे. परंतु, या आरोग्य केंद्राला बोर्ड लावलेला नाही. त्यामुळे या रोडवर अपघात झाला असता बोर्ड नसल्यामुळे नवीन लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र लक्षात येत नाही. तसेच, आरोग्य केंद्राला गाजर गवताचा विळखा पडला असून, घाणीच्या सम्राज्यामुळे आरोग्य केंद्राचेच आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता मी उद्या व्हिजिटला येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.