राज ठाकरेंचे ‘अचूक टायमिंग’; शिंदे गटाच्या स्नेहभोजनावेळी लावली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीदर्शनाला सहकुटुंब हजेरी!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जात, श्री गणरायाचे दर्शन घेतले आहे. शिंदेंच्या घरी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांसाठी नेमके आजच स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेले होते. नेमके हेच ‘अचूक टायमिंग’ साधून राज ठाकरे हेदेखील सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या घरी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे यांच्या अलिकडे वारंवार भेटी होत असल्याने, आगामी मनपा निवडणुकीत शिंदे गट आणि मनसे एकमेकांना मदत करणार की काय अशा चर्चा सुरू असतानाच आजचा हा ‘योग जुळून’ आला. वर्षा बंगल्यावर आज भाजप आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते तसेच आमदारांच्या स्नेहभोजनाचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या काहीवेळ आधीच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांचा मुंबई दौरा संपवून दिल्लीला परतले. या दौर्यात शाह यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. शाह यांच्या मिशन मुंबईच्या रणनीतीनंतर एकाच दिवसात राज ठाकरे हे भाजप-शिवसेनेच्या बैठकीवेळी वर्षावर जात असल्यामुळे पुन्हा एकदा तिन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, अशी चर्चा रंगली आहे.
अद्यापपर्यंत मनसेला ना शिंदे गटाकडून ना भाजपाकडून थेट युतीचा प्रस्ताव आलेला आहे. पण गेल्या चार ते पाच दिवसांमधील घडामोडी पाहता मुंबई महापालिका निवडणूकांच्या तोंडावर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूमिका घडणार असे संकेत मिळत आहेत. शिंदे गटाचे किरण पावसकर यांनीदेखील हिंदूत्वाच्या मुद्यावर ही नैसर्गिक युती झाली तर आनंदच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या वातावरण तर झाले आहे. प्रत्यक्षात घोषणा होते की नाही हे पहावे लागणार आहे.
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे युती सरकार सत्तेवर आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेली जहाल हिंदुत्वाची भूमिका भाजपच्या विचारधारेशी जुळणारी आहे. मात्र, मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतांचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे तूर्तास शिंदे गट आणि मनसेची मने जुळवून आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध भाजप मित्रपक्ष असा थेट सामना झाल्यास त्याचा फायदा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेविरोधात शिंदे गट आणि मनसेची युती घडवून आणल्यास मराठी मतांचे विभाजन होऊ शकते. राज ठाकरेंसारखा आक्रमक चेहरा सोबतीला घेतला तर त्याचा फायदा होऊ शकतो, अशी कुजबूज शिंदे गटात आहे.
—————–