Breaking newsHead linesMaharashtraMumbaiWorld update

भाजपचे ‘मिशन मुंबई’; अमित शाहांचा मुंबई दौरा सुरू!

– भाजप कोर कमिटीच्या बैठकीत ठरणार निवडणूक रणनीती; अनेक नेते, नगरसेवक भाजपच्या गळाला लागणार?

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत काल रात्रीच दाखल झाले असून, आज सकाळपासूनच त्यांचे काम सुरु झाले आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे नियोजन आणि रणनीती शाह हे आखत असून, राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला एकटे पाडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेण्याची शाह यांची रणनीती आहे. या शिवाय, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘इलेक्टेड मेरिट’ असलेल्या विद्यमान नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांनाही सोबत घेण्याची तयारी भाजपने चालवली आहे. भाजप कोर कमिटीची बैठक शाह हे घेत असून, या बैठकीत याबाबत रणनीती निश्चित होणार असल्याचे राजकीय सूत्राने स्पष्ट केले.  शाह यांनी सहकुटुंब लालबाग राजाच्या चरणी जाऊन दर्शन घेतले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सद्या मुंबईच्या दौर्‍यावर आहेत. रविवारी रात्री ते मुंबईत दाखल झालेत. आज ते भाजप कोर कमिटीची बैठक घेत आहेत. त्यात ते पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतील. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजप आपली कंबर कसताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर शाहांचा मुंबई दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान, अमित शाह आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची देखील भेट घेणार आहेत. सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि नंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शनाला गेले हाेते. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर  मेघदूत बंगल्यात भाजप प्रदेश कोर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी रवाना झाले हाेते.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक अमित शाह यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधी जारी करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या नियोजनात अमित शाह यांच्यासोबतच्या लालबागच्या राजा मंडळाला भेट देण्याचा कार्यक्रमही आखण्यात आला होता. मात्र नंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत आल्यानंतर त्यांनी रोहित शेट्टीची भेट घेतली आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

२९ वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ती काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. शाहांच्या मुंबई दौर्‍यानिमित्ताने मिशन मुंबईचा शुभारंभ होईल. अमित शाह हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या दर्शनाला येत आहेत. शाह २०१७ मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले होते. आशीष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेची जबाबदारी शेलार यांच्यावर आहे. मुंबई पालिकेत २२७ नगरसेवक आहेत. यावेळी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन २००’ची घोषणा केली आहे. भाजपबरोबर शिंदे गट आणि मनसेची आघाडी होण्याची शक्यता निश्चित आहे.


शाह भाजप कोर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि या कमिटीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतील आणि मुख्यमंत्र्यांशीदेखील चर्चा करतील. त्यानंतर ते पवईला ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन करतील आणि नंतर दिल्लीकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती भाजपने दिली आहे.तसेच, अमित शाह हे राज ठाकरे यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची चर्चा हे वृत्त लिहिपर्यंत सुरु होती.

AMIT SHAH TV9 LIVE


अमित शाह मुंबईत; शिवसेनेचे ‘सामना’तून टीकास्त्र!

‘दसरा मेळावा हा महाराष्ट्राची जनता जागती आहे हे देशाला दाखवणारा सोहळा असतो, पण हा दसरा मेळावा आता कोण कुठला बाटग्यांचा शिंदे गट घेणार. तर शिवसेनेवर दसरा मेळावा कुणी घ्यायचा हे मुख्यमंत्री ठरवतील असं कमळाबाई मानभावीपणे सांगते. अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचं सीमोल्लंघन करत आली आहे.’ अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून करण्यात आली आहे. दसरा मेळ्याव्याच्या परवानगीवरून वाद आता शिगेला गेल्यामुळे सामन्यातून शिंदेंना निशाणा केलं जातंय. ‘फोडा-झोडा-मजा बघा.. हेच तर भाजपचे मिशन होते. भाजपला शिवतीर्थावरच मराठी लोकांच दोन तट पडून मराठी रक्त सांडावे असं वाटतं. ज्या शिवतीर्थावरून संयुक्त महाराष्ट्राच्या विराट सभेतून एकजुटीचे दर्शन घडले, जिथे सेनेच्या विजयाची ललकारी घुमली, जिथे मराठ्यांच्या एकजुटी वङ्कामुठी आवळल्या हेच भाजपचे मिशन मुंबई आहे.’ असा आरोप भाजपवर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!