मेरा बु., ता. चिखली (प्रतिनिधी) – विजवितरण विभागात पती नोकरीला असतांनासुध्दा सासरच्या लोकांनी दोन लाख रूपयांसाठी विवाहितेला मानसिक त्रास, छळ करुन मारहाण केली. अशी तक्रार मेरा खुर्द येथील मुस्लिम विवाहितेने अंढेरा पोलीस स्टेशनला दिली तक्रारी आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या सहा जणांविरुद्ध विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल केले आहेत.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या मेरा खुर्द येथील रहिवासी असलेले मुकतार अहमद यांची मुलगी इरशद परवीन अहमद हिचा विवाह लोहारा, ता. बाळापूर, जि. अकोला येथील विजवितरण विभागात नोकरीला असलेले नासीर अहमद अब्दुल हारुन देशमुख यांच्यासोबत मुस्लिम समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे दिनांक ३१ मे २०२० मध्ये मेरा खुर्द गावामध्ये झाला होता. लग्न झाल्यानंतर सासरच्या लोकांनी चागली वागणूक दिली असून, दीड वर्षांचा मुलगासुध्दा आहे. मात्र काही महिन्यानंतर सासरच्या लोकांनी तुझ्या वडिलांकडून व्यवसायासाठी दोन लाख रूपये घेवून ये, असा तगादा लावला, तेव्हा विवाहितेने त्यांना सांगीतले की, माझ्या वडिलाची परिस्थिती फार हलाखीची आहे, माझे वडील इतके पैसे देवू शकत नाही, असे सांगताच घरच्यांनी शिवीगाळ व मारहाण करून माहेरी काढून दिले. माहेरी आल्यावर वडिलांना सर्व हकिकत सांगितली असता, वडिलांनी व्याजाने ५० हजार रुपये आणून दिले.
सासू-सासर्यांनी पैसे दिल्यानंतर पुन्हा काही दिवस चांगली वागणूक दिली आणि काही दिवस उलटताच सासरच्यांकडून त्रास सुरू झाला, की आमचा मुलगा नोकरीला आहे, तुला करून पस्तावलो. दुसरी मुलगी केली असती तर आम्हाला खूप हुंडा मिळाला असता. दीड वर्षांचा मुलगा असल्याने त्रास सहन करीत पती सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र पतीमध्ये सुधारणा झाली नाही. उलट पती सासू, सासरे, नणंद यांनी माहेरवरून आणखी दोन लाख रुपये घेवून ये, नाहीतर आमच्या मुलाला सोडून दे, आम्ही आमच्या मुलाला दुसरी मुलगी करून देणार आहे, असे म्हणत, त्रास देत शिवीगाळ करीत, घराचे दवाराजे बंद करून सर्वांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे जीव वाचावित विवाहिता माहेरी आली आणि गेल्या चार महिन्यापासून मेरा खुर्द येथे आई-वडिलांकडे राहते, अशी तक्रार विवाहितेने अंढेरा पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारी वरून ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार सिरसाट यांनी आरोपी पती नासीर अहमद अब्दुल हारुन देशमुख, सासरे हारून देशमुख, सासू फरजाना हारून देशमुख, नणंद सीना परवीन इन्तेखान, हुमा परवीन बिलाल, राणी जुनेद पटेल सर्व राहणार लोहारा, ता. बाळापूर, जि .अकोला यांच्या विरुद्ध कलम ४९८ (अ), ३२३, ५०४,५०६ ,३४, भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.