– बुलडाण्यातील नंबर प्लेटची दुचाकी चोरट्याने अकोल्यात चालवली, अकोला पोलिसांनी सोडून दिली
चिखली (एकनाथ माळेकर) – वाहतूक पोलिसांच्या वेळकाढूपणा व गलथान कारभाराचा फटका बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील पाडळी शिंदे येथील विशाल वसंतराव शिंदे यांना बसला आहे. त्यांच्या गाडीच्या क्रमांकाची डुप्लिकेट नंबरप्लेट बनवून अज्ञात आरोपीने होंडा शाईन ही दुचाकी अकोला शहरात फिरवली. ही दुचाकी अकोला येथील वाहतूक शाखेच्या पोलिसाने अडवलीदेखील. परंतु, या गाडीचे मूळ कागदपत्रे न पाहता, दुचाकीस्वाराकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे कारण देत तसा दंड लावला व ऑनलाईन चलान केले. हे चलान न भरता दुचाकीस्वार फरार झाला. हे चलान न भरल्याचे मूळ गाडीमालक शिंदे यांच्या नावाने समन्स आले असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अकोला वाहतूक पोलिस अधिकार्याच्या कामचुकारपणामुळे शिंदे यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागला, याविरोधात आपण अकोला व बुलडाणा पोलिसांच्या वरिष्ठांकडे दाद मागणार आहोत, अशी माहिती त्यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रला दिली आहे. न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अकोला शहरात दि.२६मार्च २०२१ रोजी अकोला वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी सुपेश इंगळे यांनी ई-चलाननुसार एम.एच.२८ ए.एम.२१५१ या नंबरची होंडा कंपनीची सीबी शाईन दुचाकी अडवली व दुचाकीस्वाराला अडवणूक करत सदर दुचाकीस्वाराला वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे २०० दंड आकारण्यात आला. परंतु सदर वाहतूक पोलीस कर्मचारी सुपेश इंगळे यांच्या हलगर्जीमुळे सदर दुचाकीवर बोगस नंबर प्लेट असतांना व गाडीची कागदपत्रे न तपासता, केवळ चालकाला परवाना नसल्याचा दंड बजावून इंगळे हे मोकळे झाले. परंतु, सदर प्रकरणात धक्कादायक प्रकार पुढे उघडकीस आला. दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी मूळ मालकाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा येथे लोक अदालतीमध्ये वाहतूक ई-चलन निश्चित करण्यासाठी दि.१३ ऑगस्ट २०२२ रोजी दाखल पूर्व प्रकरणासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करुन मोटार वाहन अधिनियमाच्या तरतुदीनुसार शिक्षापात्र व तडजोड पात्र अपराध केल्यामुळे त्याबाबतचे विवरण फोटोसह नोटीस मूळ मालकाला प्राप्त झाली होती.
त्यावर मूळ मालकाने सदर प्रकरणाची शहानिशा केली असता, सदर धक्कादायक प्रकार हा अकोला शहरात घडल्याचे लक्षात येऊन सदर प्रकारात दुसर्या व्यक्तीने आपल्या लाल रंगाच्या होंडा दुचाकीवर पाडळी शिंदे येथील विशाल वसंतराव शिंदे यांच्या दुचाकीचा नंबर लावून ती फसवणुकीने वापरल्याचे लक्षात आले. तेव्हा सदर वाहतूक पोलीस अधिकारी सुपेश इंगळे यांनी पाडलेल्या ई-चलनावर चालकाचे नाव श्रीकांत वडतकर हे नोंदवून चालकाकडे गाडी चालवण्याचा परवाना नसल्यामुळे २०० रुपयांचा दंड आकारला गेला होता. परंतु त्यांनी गाडीची कागदपत्रे न तपासता केवळ वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे दंड आकारला, जर वाहतूक पोलीस कर्मचारी सुपेश इंगळे यांनी गाडीची मूळ कागदपत्रे तपासली असती, तर मूळ गाडीमालकाला शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला नसता. सदर प्रकाराबाबत मूळ गाडीमालक विशाल वसंतराव शिंदे यांनी दुचाकी नंबरचा गैरवापर व सदर बोगस दुचाकीस्वाराची वेळीच पोलिसांनी चौकशी करायला पाहिजे होती. त्यामुळे या प्रकरणात वेळकाढूपणा करणारे व आरोपीला पाठीशी घालणारे वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्याविरोधात अकोला वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक आणि बुलढाणा पोलिस अधीक्षक यांच्याकडे दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना दिली आहे.