मोदींचा अजितदादांच्या खांद्यावर हात!
पंतप्रधान मोदींनी केला वारकरी धर्माचा गौरव
देहू (पिंपरी-चिंचवड)/ नम्रता जोशी
देहू येथील जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज मंदीराचे (शिळा मंदीर) लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज (दि.१४) मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात झाले. समाजाला भागवत धर्माच्या मार्गावर नेण्याचे काम संत ज्ञानेश्वरांनी केले तर त्यावर कळस चढविण्याचे काम जगदगुरु संत तुकाराम महाराज यांनी केल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी काढले. तत्पूर्वी, विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर मोदींनी हात ठेवून त्यांच्याशी गुजगोष्टी केल्याने, त्याची एकच चर्चा सुरु झाली होती. राज्यसभा निवडणुकीत अजित पवारांची संदिग्ध भूमिका आणि आज मोदींचे खांद्यावर हात ठेवणे, याबद्दल चर्चांना उधाण आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथील सभास्थानी पोहोचण्यासाठी दुपारी एक वाजता लोहगाव विमानतळावर आले होते. तेथे अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक व आमदार माधुरी मिसाळ यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी मोदी यांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवून काहीक्षण त्यांच्याशी गुजगोष्ट केली. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते.
शिळा मंदीराचे लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी शिळा मंदीर तसेच इंद्रायणी नदी परिसराची पाहणी केली व संत तुकोबांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले, की ज्ञानेश्वर माऊलींनी जो अखिल विश्वाचा विचार आपल्याला दिला, त्याच मार्गावर आज देशाचे नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करीत आहेत. कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाला मदत करण्याचे काम मोदीजींच्या नेतृत्त्वात झाले. सबका साथ-सबका विकास, सबका विश्वास-सबका प्रयास! वारकर्यांच्याच या ब्रिदावर आज देशाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आज वारकर्यांच्या भूमिकेतूनच काम करीत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.