खासगी फायनान्सने घेतला बळी; अंत्री खेडेकर येथे ३५ वर्षीय शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या
– खासगी फायनान्सच्या छळाला वेसन बसणार का?
– जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने दखल घेण्याची गरज!
चिखली (एकनाथ माळेकर) – ग्रामीण भागात खासगी फायनान्सवाल्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पटकन कर्जे देत असल्याने गोरगरीब लोकं व शेतकरी, शेतमजूर त्यांच्या आमिषांना बळी पडत आहेत. एकदा कर्ज घेतले की वारेमाप व्याज आणि पैसे भरण्यासाठी अतोनात छळ, दमदाटी होत असल्याने गोरगरीब लोकांवर आत्महत्येची पाळी आली आहे. अनेक शेतकरी, शेतमजूर या फायनान्स वाल्यांच्या जाचाला बळी पडत आहेत. खासगी सावकारी परवडली पण हे फायनान्स नको, असे म्हणण्याची वेळ खेड्यापाड्यांत आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने या खासगी फायनान्सवाल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, व लोकांचे जीव वाचवावेत, अशी मागणी ग्रामीण भागातून पुढे आली आहे. अशाच एका खासगी फायनान्सच्या अतोनात छळाला कंटाळून अंत्री खेडेकर येथील प्रवीण अशोक जाधव (वय ३५) या तरुण शेतमजुराने काल रात्री घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने अंत्री खेडेकरसह परिसरात एकच खळबळ उडाली असून, खासगी फायनान्सवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, पैसे वसुलीसाठी दबाव आणणार्यावरही गुन्हे दाखल करून, त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी पुढे आली आहे.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील प्रवीण अशोक जाधव (वय ३५) या तरुण शेतमजुराने काल रात्री साडेआठ वाजता स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रवीण जाधव याच्यावर तीन खासगी फायनान्सचे कर्ज होते. त्यामध्ये पी केअर ५० हजार रुपये, भारत फायनान्स ५० हजार रुपये, व एक स्वतंत्र बँक ५० हजार रुपये, असे एकूण एकूण दीड लाख रुपये कर्ज त्याच्यावर होते. यावर्षी पडलेला ओला दुष्काळ व पिकांवर झालेला रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतमजुरांना खेड्यापाड्यांत कामे मिळत नाहीत. तसेच कोरोनामुळे गेली तीन वर्षे ग्रामीण भागात काही रोजगारही नसल्याने प्रवीण जाधव हा हे पैसे व त्याचे हप्ते वेळेवर फेडू शकला नाही. त्यामुळे या खासगी फायनान्सवाल्यांनी त्याच्यावर पैसे भरण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला होता. तसेच, त्याला वैयक्तिकरित्या धमक्याही दिल्या जात होत्या, अशी चर्चा गावात होत आहे. त्यामुळे प्रचंड नैराश्यात गेलेल्या प्रवीणने काल रात्री घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
प्रवीण याच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी तातडीने या शेतमजुराच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पुढे आली असून, चिखली पोलिसांनी संबंधित खासगी फायनान्स व प्रवीणचा छळ करणार्या वसुलीवाल्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही होत आहे.
————-