चिखली (तालुका प्रतिनिधी) – शहरातील तुळजाई महिला अर्बनसमोरील इक्साईड बॅटरी दुकानावरील दुसर्या मजल्यावर आज सकाळी अचानक आग लागली. या आगीची माहिती कळताच शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी तातडीने तहसीलदार चिखली व अग्निशमन दलाला कळविल्याने अग्निशमन दलाच्या बंबाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवली. या घटनेने परिसरातील व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेजारीच अॅक्सिस बँकेचे एटीएम होते, आग आटोक्यात आल्याने या एटीएमसह त्यातील लाखोंची रोकड वाचली आहे. लाईनमन राम लुल्ले यांनीदेखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
चिखली येथील क्रीडा संकुल मंदिरासमोरील तुळजाई महिला अर्बन समोरच्या एक्साईड बॅटरी दुकानाच्या दुसर्या मजल्यावर अचानक आग लागली. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी, कुलरचे साहित्य व इतर सामान जळाले आहे. या आगीची माहिती कळताच शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्यासह नितीन राजपूत हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांना माहिती देऊन अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारून ही आग विझवली. हे दुकान सुहास हांडे यांचे असून, तेथे एक्साईडच्या बॅटर्या व इतर बरेच असे सामान होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सरनाईक यांच्या दक्षतेने व प्रशासनाच्या सतर्कतेने आग आटोक्यात आली नसती तर मात्र मोठे नुकसान सोसावे लागले असते, कारण बाजूलाच अॅक्सिस बँकेचे एटीएम असून, त्यात मोठी रोकड होती. या घटनेने व्यापारीवर्गात एकच खळबळ उडाली होती.