BuldanaBULDHANAChikhaliHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

चिखलीत २४ उमेदवार रिंगणात; लढत मात्र श्वेताताई महाले व राहुल बोंद्रे यांच्यातच!

- महायुतीतील बंडखोरी टळली; बुलढाण्यात विजयराज शिंदेंनी अर्ज माघारी घेताच चिखलीतून मृत्यूंजय गायकवाडांचाही अर्ज मागे

– चिखलीत रविकांत तुपकरांची तलवार म्यान; शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांचेही अर्ज माघारी!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे राजकीय चित्र आज (दि.४) अखेर स्पष्ट झाले असून, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ४३ जणांपैकी पैकी १८ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर चार अर्ज हे छाननीतच बाद झाले होते. त्यामुळे आता २४ उमेदवार मैदानात आहे. विशेष म्हणजे, शेतकरी संघटना क्रांतीकारीचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत या दोघांनीही आपले अर्ज मागे घेतले आहेत. या मतदारसंघात भाजपच्या श्वेताताई विद्याधर महाले पाटील व काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांच्यातच लढत होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. दुसरीकडे, विकासकामांच्या जोरावर आपण निश्चितच विजयी होऊ, असा विश्वास श्वेताताईंनी व्यक्त केला आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघासाठी ४३ व्यक्तींनी ६३ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. छाननीअंती चार अर्ज बाद झाले होते. तर आज दिनांक ४ ऑक्टोबररोजी अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या अंतिम दिवशी १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेवून माघार घेतली असून, चिखली विधानसभेसाठी आता २४ उमेदवार रिंगणात आहेत. बुलढाण्यात भाजपचे संपर्कप्रमुख विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव मृत्युंजय गायकवाड यांनी चिखलीतून आपला अर्ज दाखल केला होता. बुलढाण्यात विजयराज शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर इकडे चिखलीतून मृत्यूंजय गायकवाड यांनीदेखील अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे महायुतीतील बंडखोरी टळली आहे. या शिवाय, मनोज लाहूडकर, वृषालीताई राहुल बोंद्रे, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी ओंकार गवई, शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत, रवींद्र डाळिंबकर, सिद्धार्थ पैठणे, अब्दुल रियाज अब्दुल समद सौदागर बबन दिगंबर राऊत, अ‍ॅड. सतीश गवई, संजय धोंडू धुरंदर, देवानंद पांडुरंग गवई, अब्दुल वहिद शेख इस्माईल, शरद रामेश्वर खपके, राजेंद्र सुरेश पडघान, मिलिंदकुमार मघाडे, नाजेमा नाज इमरान खान आदींनी आपले अर्ज आजरोजी मागे घेतले आहेत.


विधानसभेसाठी महायुतीकडून बुलढाण्याची जागा शिंदे गटाला सुटल्यानंतर भाजपचे इच्छुक उमेदवार विजयराज शिंदे यांनी बंडखोरी कडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदे यांनी भाजपकडे मैत्रीपूर्ण लढतीची परवानगीदेखील मागितली होती. मात्र ही परवानगी नाकारत शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, असे त्यांना सांगण्यात आले. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिंदे गटाला बुलढाण्याचा मार्ग सुकर होणार आहे. काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर विजयराज शिंदे यांनी ही माघार घेतली असल्याचे सांगण्यात आले.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!