राजकीय चक्रव्युहात कु. गायत्री शिंगणेंचा झाला ‘अभिमन्यू’!
- अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी अनेकांनी ठोकला मुंबईत तळ!
– कु. गायत्री शिंगणेंनी घेतली अजितदादांची भेट; उमेदवारीबाबत चर्चा न झाल्याची माहिती
– उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात तरी महायुतीचे उमेदवारीबाबत भिजत घोंगडे!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघासाठी काल (दि.२२) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असतानादेखील महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नाही. दुसरीकडे, महाआघाडीकडून विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारीदेखील जाहीर झाली असून, ते दि.२५ ऑक्टोबररोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्जदेखील भरणार आहे. सिंदखेडराजाची जागा भाजपने मागितली असून, महायुतीच्या वाटपात मात्र ती अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे येथून उमेदवारीसाठी जवळपास डझनभर इच्छुकांनी दादांकडे फिल्डिंग लावली आहे. कालपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जवळपास निश्चित मानल्या जात असलेल्या कु. गायत्री शिंगणे यांना शरद पवारांनी जबर धक्का देत, त्यांच्या काकांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही दिल्याने गायत्री यांचा राजकीय चक्रव्युहात अभिमन्यू झाला आहे. अनेकांनी त्यांना तूर्त थांबण्याचा सल्ला दिला असून, काकांच्या नेतृत्वात पक्षात काहीकाळ काम करण्याचे समजावले आहे. तरीही, त्यांनी काल अजितदादा पवारांची भेट घेतली. या भेटीचा तपशील हाती आला नसला तरी, ही अराजकीय भेट होती, असे त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले आहे. कु. गायत्री यांचा संताप व जीद्द पाहाता, एकवेळ त्या अपक्षदेखील लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूकपूर्व गाठीभेटी वाढल्या आहेत. कालपर्यंत ज्यांच्या हाती ‘तुतारी’ होती, त्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे उमेदवारी मागितली असल्याचे समजते. जर भाजपला आणि शिवसेनेला हा मतदारसंघ सुटला नाही तर हातात घड्याळ बांधण्यासाठी रीघ लागली आहे. मग त्यात कु. गायत्री गणेश शिंगणे कशा मागे राहतील बरे? हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल? माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची भूमिका काय राहील? यावर अनेक दिवस खलबते सुरू होती. कार्यकर्त्यांना मात्र ठाम विश्वास होता की, साहेब ‘तुतारी’च हाती घेतील. अखेर २१ ऑक्टोबररोजी शरदचंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश करीत ‘तुतारी’ हाती घेतली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक अनेक होते. परंतु, पवार साहेबांनी डॉ. शिंगणे यांना प्रवेश देऊन अनेकांना धक्का दिला. आता ज्यांनी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली होती, त्यापैकी माजी समाजकल्याण सभापती अभय चव्हाण, साखरखेर्डा तालुका मागणीचे समर्थन वसंतराव मगर, कु. गायत्री गणेश शिंगणे यांनी आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, भाजपचे जिल्हा युवा सरचिटणीस अंकुर देशपांडे यांचा समावेश होता. आता त्यांनी अजितदादा पवारांकडे संपर्क वाढवून उमेदवारीसाठी प्रयत्न चालविल्याची राजकीय चर्चा आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला नाही तर माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या नावाची शिफारस दादांकडे अनेकांनी केली आहे. सर्वांनाच वाटते यावेळी परिवर्तन घडवून आणायचे. परंतु, मोळी कोण बांधणार? हा प्रश्न आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे यांना पराभूत करण्यासाठी सक्षम उमेदवाराची गरज आहे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा या निवडणुकीत झाल्या तर काय होईल, हे सांगण्याची गरज नाही.
आज भाजपकडे डॉ. सुनील कायंदे, विनोद वाघ, डॉ. गणेश मांन्टे यांनी उमेदवारी मागितली आहे. तर ९९ उमेदवारांची भाजपने यादी जाहीर केली असताना त्यात बुलढाण्यातून फक्त विद्यमान आमदारांची घोषणा झाली. तर आता मलकापूर हा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. चार मतदारसंघ भाजपकडे गेल्यानंतर तीन मतदारसंघ शिल्लक राहतील? त्यात दोन मतदारसंघ अगोदरच शिंदे शिवसेना गटाकडे आहे, त्यात बदल होणे नाही. राहिला सिंदखेडराजा मतदारसंघ. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहील, यात दुमत नाही. त्यामुळे अनेकांनी मुंबई येथे मुक्काम ठोकले आहेत. काहीजण मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ठाण मांडून आहेत. डझनभर इच्छुकांनी उमेदवारी मागितली असली तरी एकालाच उमेदवारी मिळणार यात शंका नाही. परंतु, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी एकत्र येऊन मोट बांधून काम करण्याची गरज आहे. ओबीसी उमेदवाराला उमेदवारी मिळाली तर माळी, बंजारा, वंजारी या नेत्यांना एकत्र येणे महत्त्वाचे आहे. त्यात भाजप, शिवसेना नेत्यांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे. हे झाले नाही आणि बंडखोरी झाली तर निवडणूक कठीण आहे. काल कु. गायत्री शिंगणे यांनी अजितदादा पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. माझी भेट ही वैयक्तिक होती, अशी माहिती कु. गायत्री शिंगणे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला बोलतांना दिली. दि.२९ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. पाच दिवसांत काय घडामोडी होतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले फक्त पाच दिवस; इच्छूकांची धडधड वाढली!
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी डझनभर नेते इच्छूक आहेत. परंतु, महायुतीचे जागावाटप रखडले आहे. त्यातच महाआघाडीच्या निरोपाची शेतकरी नेते रविकांत तुपकर हे वाट पाहात आहेत. त्यांना अनुकूल निरोप आला नाही तर तेदेखील सिंदखेडराजा मतदारसंघात उमेदवार टाकण्याची शक्यता आहे. ही जागा अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याने, पूर्वी जे उमेदवार शरद पवारांकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते, ते आता अजितदादांकडे प्रयत्न करत आहेत. परंतु, उमेदवारी मिळत नसल्याने त्यांचा जीव धाकधूक करत आहेत. दुसरीकडे, कालपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे व सौ. सविताताई मुंडे हे दोन उमेदवार सोडले तर कुणाकडेच पक्षाचे एबी फॉर्म नाहीत. आजचा दिवस तर गेल्यातच जमा आहे. त्यात २७ तारखेला रविवार असल्याने सुट्टी आहे. २९ तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजे, उमेदवारांकडे फक्त पाच दिवस उरले आहेत.