बुलढाण्यात शिंदे गटाचे आमदार ‘रिपीट’; ४५ जणांची पहिली यादी जाहीर!
- बुलढाणा संजय गायकवाड, मेहकर डॉ. संजय रायमुलकर यांना पहिल्याच यादीत मिळाले मानाचे पान
– शिवसेना (शिंदे गट) पहिल्या यादीत दिसली घराणेशाही; विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी!
मुंबई (प्रतिनिधी) – शिवसेना एकनाथ शिंदे गटाची पहिली यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाली. या यादीत विद्यमान मंत्र्यांसह ४५ जणांची नावे आहेत. बुलढाण्यात संजय गायकवाड तर मेहकरातून डॉ. संजय रायमुलकर यांना पुन्हा संधी मिळाली आहे. स्वत: शिंदेंसह त्यांना बंडात साथ देणार्या सर्व आमदारांना उमेदवारी मिळाली आहे. या पहिल्याच यादीत अनेक असे चेहरे आहेत, ज्यांचे वडील, पती अथवा भाऊ विद्यमान आमदार किंवा माजी मंत्री आहेत. त्यामुळे या यादीत घराणेशाही पहायला मिळाली आहे. अनेक मतदारसंघांमध्ये नव्या व तरूण उमेदवारांऐवजी प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले असून, एरंडोल, दर्यापूर, पैठण, जोगेश्वरी पूर्व, राजापूर व खानापूर मतदारसंघातून प्रस्थापित नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडात साथ देणारे बुलढाणा जिल्ह्यातील दोन व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचही शिलेदारांना शिवसेनेच्या पहिल्या यादीत मानाचे स्थान मिळाले. मंत्री अब्दुल सत्तार (सिल्लोड), संजय शिरसाट (संभाजीनगर पश्चिम), प्रदीप जैस्वाल (संभाजीनगर मध्य), रमेश बोरनारे (वैजापूर), संजय गायकवाड (बुलढाणा), डॉ. संजय रायमुलकर (मेहकर) यांचा त्यात समावेश आहे. पैठणचे संदीपान भुमरे खासदार झाल्याने त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना तिकिट देण्यात आले. दुसरीकडे, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदार संघातून निवडून येतात. या यादीत तानाजी सावंत यांचे नाव पाहिल्या यादीत आहे. परंतु, त्यांचे ज्येष्ठ बंधू शिवाजी सावंत हे सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असताना, त्यांचे नाव मात्र यादीत आलेले नाही. प्रा. शिवाजीराव सावंत हे अनेक दिवसांपासून सोलापूर शहरात तळ ठोकून बसले आहेत. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक महाआरोग्य शिबिरे घेत, जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. तानाजी सावंत यांचे नाव जाहीर झाले तर त्यांचे बंधू शिवाजी सावंत हे अजूनही वेटिंगवर आहेत. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातील मनीष काळजे, ज्योती वाघमारे, प्रमोद मोरे आदी नेत्यांनी ताकद लावली आहे.
दुसरीकडे, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसघातून शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या मुलाला म्हणजेच विलास भुमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. सांगलीच्या खानापूरमधून अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना उमेदवारी मिळाली आहे. मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांच्या भावाला म्हणजेच किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी मिळाली आहे. दापोलीमधून पुन्हा एकदा आमदार योगेश कदम यांना उमेदवारी दिली आहे. योगेश कदम यांचे वडील रामदास कदम हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत भाजपचे ९९, अजित पवार गटाचे १७ व शिंदेसेनेचे ४५ असे महायुतीचे १६१ उमेदवार जाहीर झाले आहेत. अजून १२७ जणांची नावे बाकी आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने अजून अधिकृतपणे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. जागावाटपाच्या वादातच त्यांची गाडी अडकलेली दिसते आहे.
—————