पावसाने बुलढाणा जिल्ह्यात अतोनात नुकसान; आचारसंहितेपूर्वी मदत जाहीर करा!
- शेतकरी नेते रविकांत तुपकर, विनायक सरनाईक यांची मागणी
– इतर नेते सणासुदीत मग्न असताना, अॅड. शर्वरीताई तुपकर, विनायक सरनाईक पोहोचले शेतबांधावर; शेतकर्यांना दिला दिलासा!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हाभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने, सोयाबीन, कपाशी, तूरसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीप्रकरणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दसरा सण साजरा करण्यात मग्न असताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरीताई तुपकर व विनायक सरनाईक यांनी मात्र शेतबांधावर जाऊन, शेतकर्यांना दिलासा दिला. तर राज्य सरकारने आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर व विनायक सरनाईक यांनी केली आहे. या पावसाने अनेक नद्या व नाल्यांना पूर आले आहेत, शेतीपिकांची नासाडी झाली आहे. मोताळा, चिखली, बुलढाणा तालुक्यांत मोठे नुकसान झालेले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र झालेल्या पावसामुळे बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने शेतकर्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी, अन्यथा सरकारला शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर व विनायक सरनाईक यांनी दिला आहे.
काल मध्यरात्री व आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने बुलढाणा, चिखली, मोताळा तालुक्यांत प्रचंड नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यातील आडविहीर, वरुड, पिंपळगाव देवी या परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी अॅड. शर्वरीताई रविकांत तुपकर यांनी केली. त्यांनी शेतकर्यांना धीर दिला. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या आहेत, तर काढणीवर आलेले सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तात्काळ झालेल्या या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीदेखील शर्वरीताई तुपकर यांनी केली आहे, तसेच शेतकर्यांच्या भावनांचा अंत पाहू नये, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.