‘उमेद’ चे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन सिंदखेडराजा येथे संपन्न!
- उमेद कर्मचारी व केडर यांना कायमस्वरुपी करण्याच्या मागणीसाठी प्रथमच झाले अधिवेशन
किनगाव राजा (सुरेश हुसे) – जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा येथे उमेद अभियान महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना यांच्या वतीने नुकतेच ( दि. ९ ऑक्टोंबर रोजी) ‘उमेद’ अभियान स्वतंत्र करून ‘उमेद’ च्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. उमेदचे कर्मचारी आणि केडर यांना कायम स्वरुपी करण्यात यावे या मागणीसाठी सुमारे ५० हजार कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदाच या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी राज्यभरातील कानाकोपऱ्यातून महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
लाडकी बहीण योजने अंतर्गत आशा कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्यात आले हा अन्याय असून, उमेदवाराला स्वतंत्र दर्जा देण्यात यावा व जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना शासनाने कायम करावे अशा विविध मागण्यांचे ठराव यावेळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आले. या अधिनेशनाला विविध पक्षाचे अनेक राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार शशिकांत खेडेकर, मा. आ. चंद्रकांत दानवे, आ. तोतारामजी कायंदे, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर, वंचितच्या नेत्या सविता मुंढे, सिंदखेडराजा काँग्रेस शहर अध्यक्ष सिद्धार्थ जाधव आदींनी या अधिवेशनात जे विषय मांडले त्याला उपस्थितांनी पाठिंबा देऊन शुभेच्छा दिल्या. उमेद कर्मचारी संघटनाचे राज्य अध्यक्ष स्वप्निल शिर्के, महिला कार्यकारिणी राज्य अध्यक्ष रुपाली नाकाडे, निर्मला शेलार, रुपेश मर्चन्ट, नवनाथ पवार, बाबासाहेब सरोदे, संदीप दाभाडे, श्याम खोंड, विक्रांत जाधव, विजय चव्हाण तसेच इतर सर्व कर्मचारी व कॅडर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अमर जाधव, किशोर झोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.