आ. डॉ. राजेंद्र शिंगणे ‘महायुती’चेच उमेदवार; राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाकडूनच निवडणूक लढणार!
- जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांची 'ब्रेकिंग महाराष्ट्र'ला माहिती; सर्व चर्चांना लावला पूर्णविराम!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूक कोण लढणार? विद्यमान आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे कोणत्या पक्षाकडून लढणार? याबाबत अनेक खलबते सुरू झाली आहेत. परंतु, विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे महायुतीकडूनच आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडूनच निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना स्पष्ट करत, या संदर्भातील सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम दिला आहे.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधानसभा निवडणुकीसाठी धोरणात्मक निर्णयात महत्वाची भूमिका असलेले अॅड. नाझेर काझी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, २०२४ ची विधानसभा निवडणूक आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महायुतीचे उमेदवार म्हणून लढणार आहेत. सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघात गेल्या सहा पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी विजय मिळविला आहे. २०१४ साली काही कारणास्तव त्यांनी निवडणूक लढविली नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे आमदार म्हणून डॉ. शशिकांत खेडेकर यांचा विजय झाला होता. तो अपवाद वगळता प्रत्येकवेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व या मतदारसंघात राहिले आहे. आजही सर्व सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, असे अॅड. काझी यांनी स्पष्ट केले.
महायुतीची निवडणूकसंदर्भात चर्चा झाली असून, ज्या पक्षाचा आमदार तो मतदारसंघ त्या पक्षाला सुटणार आहे. त्यानुसार सिंदखेडराजा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटलेला आहे, यात दुमत नाही. शरदचंद्र पवार साहेब हे मोठे राष्ट्रीय नेते आहेत. त्याच्यावर टीका करणे ही आपली संस्कृती नाही. आजपर्यंत माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोणत्याही वरिष्ठ नेत्यांवर टीका केली नाही. त्यांनी उलट टीका करणार्या वाचाळवीरांना एकदाची समज द्यावी, अशी भूमिका घेतली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात ही संस्कृती योग्य वाटत नाही. आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्यांच्या कामाची पध्दत सर्वांना सोबत घेऊन चालण्याची राहिली आहे. मतदारसंघाचा विकास हे उद्दिष्ट ठेऊन त्यांनी काम केले आहे, आणि आजही ते काम करत आहेत. २०२४ ची निवडणूक ते घड्याळ याच चिन्हावर लढणार आहेत, असेही अॅड. काझी यांनी निर्विवादपणे स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने एकमेव नाव डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे असून, शिंदे गटाकडून माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि योगेश जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. दोघांनीही मतदारसंघात फिरून मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपण कसे योग्य आहोत, हे ते पटवून देत आहेत. तर भाजपकडून इच्छूक असलेले डॉ. सुनील कायंदे यांनीसुध्दा प्रत्येक गावात जाऊन आपले संपर्क अभियान चालविले आहे. त्यांच्या पाठीशी वंजारी समाजाची एक गठ्ठा मते आणि भाजपची पारंपरिक मते, अशी जमेची बाजू आहे. ओबीसी आघाडीचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष या पदावर काम करताना ओबीसी समाजाला दिशा देण्याचे काम ते करीत आहेत. परंतु, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय राहील, हे येणार्या निवडणुकीत कळेल. महाविकास आघाडीच्यावतीने हा मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे जाण्याची शक्यता असून, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ यांनी प्रत्येक गावात जाऊन मशाल यात्रा काढली आहे. सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून शिवसेनेने ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्यासाठी अनेक इच्छुक नेत्यांनी बारामती, पुणे अशा वार्या सुरू केल्या आहेत. परंतु, मतदारसंघात पाहिजे तसा जनसंपर्क त्यांचा राहिला नाही. उमेदवारी मिळाल्यानंतर पाहू! अशी भूमिका घेऊन तुम्ही आमचे नाव बातमीत चालवा; ऐवढ्यावर त्यांची भूमिका दिसत आहे. मतदारसंघात एकही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा संभाव्य उमेदवार फिरताना दिसत नाही. वसंतराव मगर यांनी बहुजन वंचित आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या १९९० पासून वसंतराव मगर यांचा या मतदारसंघात संपर्क आहे. तर वंचित बहुजन आघाडीने येथून सविताताई मुंढे या वंजारी-ओबीसी समाजातील महिला नेतृत्वाला उमेदवारी जाहीर केली आहे. हा मतदारसंघ नेमका शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे जातो, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जातो, यावर उमेदवार निश्चित होणार आहे.