श्रेयवादाच्या कचाट्यात अडकण्याचे भय दूर; शेतकर्यांच्या खात्यात १७० कोटी आले!
- कापूस-सोयाबीन अनुदान खात्यात येणे सुरू; चार लाख शेतकर्यांच्या खात्यात १७० कोटी जमा!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – पीकविमा असो, की इतर शेतकरी अनुदान हे जमा होण्याच्या हालचाली सुरू झाल्या, की शेतकरी नेते रविकांत तुपकर हे लक्ष्यवेधी आंदोलन करतात. त्यानंतर ते अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर पडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात, व त्याचा राजकीय फायदा त्यांना होतो. अशाप्रकारच्या चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदारपणे रंगलेल्या असतानाच, या असो की, इतर काही असो, भानगडींमुळे ‘तारीख पे तारीख’चा कंटाळा आलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना आता काहीसे दिलासादायक वाटले असून, जिल्ह्यातील चार लाख शेतकर्यांचे खात्यात १७० कोटी रूपयांच्या जवळपास अनुदान जमा झाले आहे. यामुळे श्रेयवादाच्या लढाईत अडकण्याची शेतकर्यांची भीतीही आता दूर झाली आहे.
गेल्यावर्षी कापूस व सोयाबीनला कमी भाव असल्याने राज्य सरकारने भावांतर योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत ५ हजार रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु अनुदान बरेच दिवसांपासून जमा होत नव्हते, तर फक्त शासनाकडून तारखाच देण्यात येत होत्या. त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. यावर्षीही पावसाने हातचे पीक गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे या अनुदानाच्या पैशाची थोडीफार ‘उट ‘लागेल, या आशेवर तो बसला होता. अखेर गेल्या दोन दिवसांपासून शेतकर्यांच्या खात्यात अनुदान जमा होणे सुरू झाले असून, आजपर्यंत जिल्ह्यातील ४ लाख १५ हजार २४२ कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या खात्यात १७० कोटी ६३ लाख ९६ हजार ६२ रूपये जमा झाले आहेत. कापूस व सोयाबीन शेतकर्यांसाठी अनुदान मिळावे, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, शेतकरी नेते रविकांत तुपकर व जिल्ह्यातील आमदारांनी पाठपुरावा केल्यामुळे झालेल्या श्रेयवादाच्या कचाट्यात आपण सापडतो की काय? अशी भीती शेतकर्यांना सतावत होती. परंतु, आता अनुदान जमा होणे सुरू झाल्याने त्यांना काहीसे हायसे वाटले आहे.
तालुकानिहाय शेतकरी व जमा झालेले अनुदान खालील तक्त्यात दिले आहे.