अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंच्या घरी चहा-पाणी, न्याहरी!
– दानवे म्हणतात, आमचे मनोमिलन झाले, जालना लोकसभा भाजपचीच!
– संकट असेल तर कुणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल : खोतकरांचे सूचक वक्तव्य
जालना/नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – नाही, हो… म्हणत असले तरी शिवसेना उपनेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानंतर, आज सकाळी खोतकर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी सकाळी हजेरी लावत, त्यांच्यासोबत चहा-पाणी, न्याहरी घेतली. त्यानंतर, दानवे यांनी आमच्या दोघांचे मनोमिलन झाले असून, मी त्यांच्या तोंडात साखर घालून तोंड गोड केले आहे, असे सांगितले. तसेच, जालन्याची जागा भाजपचीच राहील, असेही दानवे म्हणाले. तर संकटात असताना कुणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल, अशा सूचक शब्दांत खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोतकर हे शिंदे गटात गेले तर जालना जिल्ह्यात शिवसेनेला मोठा झटका बसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री व शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर हे दिल्लीत तळ ठोकून बसलेले आहेत. ते शिंदे गटात सामील झालेले आहे, परंतु तसे त्यांनी जाहीर केलेले नाही. शिंदे गटात सामील झाल्यानंतर अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये दिलजमाईदेखील झाली आहे. आज सकाळी दानवे यांनी खोतकरांनी न्याहरी करण्यासाठी घरी बोलावले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांत जवळपास एक तास बैठक पार पडली. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या दोघांची दिलजमाई झाल्यानंतर ही बैठक पार पडली.
या बैठकीनंतर बोलताना, संकट असेल तर कुणीही सेफ होण्याचा प्रयत्न करील, असे सूचक वक्तव्य खोतकर यांनी केले. त्यामुळे त्यांच्या साखर कारखानाप्रकरणी ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खोतकर हे मोठा निर्णय घेण्याचे संकेत मिळत आहेत. तर, आमचे मनोमिलन झाले आहे. आता आमचे ठरले आहे. मात्र, जालन्यातील लोकसभा भाजपच लढवणार, अशी प्रतिक्रिया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. मी खोतकरांच्या तोंडात साखर घालून त्यांचे तोंड गोड केले, असेही दानवे यांनी सांगितले.
शिंदे यांना पाठिंबा दिल्यास त्यांच्या रावसाहेब दानवे यांच्या लढ्याचे काय होणार, असा प्रश्न खोतकरांसमोर निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यात शिंदे यांना यश आल्याचे बोलले जात आहे. मात्र खोतकर हे गेल्या काही काळापासून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) निशाण्यावर आहेत. अशा स्थितीत तपास टाळण्यासाठी ते उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गोटात जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. दरम्यान, खुद्द अर्जुन खोतकर यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नसले तरी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत भेटल्याने ते काहीतरी मोठा विचार करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
खाेतकरांनी दानवेंच्या तोंडात मारली हाेती : खैरे
शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकरांनी ईडीच्या दबावाला घाबरु नये. त्यांनी संकटकाळात पक्ष सोडू नये असे भावनिक आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. रावसाहेब दानवे विचित्र माणूस असून ते धोका देणारे आहेत, अशी टीकाही खैरेंनी केली. अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असून त्यानंतर आता भाजप, शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी त्यांना भावनिक साद घालीत आपली प्रतिक्रिया दिली. खैरे् म्हणाले, दानवे आणि खोतकरांचे वैर असले तरी त्यांना मुद्दाम एकत्र आणुन राजकारण केले जात आहे. त्यावर मी बोलणार नाही. अर्जुन खोतकर हिच व्यक्ती रावसाहेब दानवेंना सरळ करणारे आहेत, दानवेंना एक थापड खोतकरांनी तोंडावर मारली होती, आता साखर खा म्हणाले.