रविकांत तुपकरांना सक्तीने जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातून हटवले!
- बुलढाण्यात तणाव, तुपकर पोलिसांच्या ताब्यात!
– पीकविम्याच्या रकमेसाठी तुपकरांचे आंदोलन, कृषी अधीक्षकांना धरले धारेवर!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम मिळेपर्यंत हटणार नाही, असे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यासाठी मुक्कामी गेलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात ताब्यात घेऊन त्यांना कृषी अधीक्षक कार्यालयातून बाहेर काढले. यावेळी पोलिस व तुपकर समर्थकांमध्ये चांगलीच ताणाताणी निर्माण झाली होती. सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है.. अशा घोषणा यावेळी कार्यकर्ते देत होते. तुपकरांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील कारवाईबाबत पोलिस अधिकारी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत होते, अशी माहिती हाती आली आहे. दरम्यान, बुलढाणा पोलिस ठाण्यासमोर शर्वरीताई तुपकरांसह शेतकर्यांचे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उद्या कदाचित तुपकरांना कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकर्यांना हक्काच्या पीकविम्याची रक्कम का देत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करत गादी, उशी व बॅग घेवून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांच्या कार्यालयात ‘मुक्काम आंदोलन’ चालू केले होते. हक्काचा पीकविमा तात्काळ जमा करा, असे म्हणत तुपकरांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना चांगलेच फैलावरदेखील घेतले होते. पीकविमा, शेतीपिकांच्या नुकसान भरपाईप्रश्नी राज्य सरकारकडून वारंवार तारीख पे तारीख देण्यात येत असल्याच्या धोरणाचा निषेध शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. दि. १५ सप्टेंबरपर्यंत पीकविम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल, असा शब्द कृषी सचिवांनी याआधी दिला होता. तो शब्द सरकारने पाळला नाही म्हणून तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या कार्यालयात तुपकर हे अंथरूण आणि पांघरून सोबत घेऊन गेले. जोपर्यंत शेतकर्यांच्या खात्यात पीकविम्याचे पैसे पडत नाहीत तोपर्यंत आपण इथेच मुक्काम करणार आहोत असे म्हणत, रविकांत तुपकर यांनी कृषी अधीक्षकांच्या दालनातच गादी टाकून मुक्काम ठोकला. त्यामुळे दुपारपासून अधिकारी व पोलिस हे तुपकरांशी चर्चा करत होते. तुपकरांचे मुक्काम आंदोलन चालू केल्याचे कळताच शेतकर्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती, तर कृषी अधीक्षक कार्यालयात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. त्यामुळे कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. तुपकरांना कार्यालयाबाहेर काढताना तणाव निर्माण होत होता. त्यामुळे अखेर रात्री आठ वाजेच्या सुमारास बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेऊन, कार्यालयातून बाहेर काढले. त्यामुळे घटनास्थळी चांगलाच तणाव निर्माण झाला होता. तर, हे आंदोलन चांगलेच पेटणार असल्याचे संकेत प्राप्त झालेले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. बुलढाणा पोलिस हे सत्ताधार्यांच्या इशार्यावर काम करत आहेत. मला गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही. शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम मिळवूनच देणार, असा इशारा तुपकरांनी दिला आहे.
————
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनाच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा कौल!