शिवरायांचा निकृष्ट पुतळा बनविणारा जयदीप आपटे घराला कुलूप लावून पळून गेला!
– मालवणमध्ये कडकडीत बंद; राज्यभरात महाआघाडीकडून आंदोलनाची हाक!
– संभाजीराजे छत्रपतीही राज्य सरकारवर संतापले; चुकीच्या पत्राबाबत कळवूनही सरकारने दुर्लक्ष केले!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा पुतळा कोसळल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्टचरल इंजिनिअर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. यापैकी शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे घराला टाळे लावून पळून गेलेला आहे. तर चेतन पाटील यांनी आपण फक्त पुतळ्याचे डिझाईन दिले होते. पुतळा बांधण्याशी आपला काहीही संबंध नाही, असे सांगून आपटे याच्यावर खापर फोडले आहे.
प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा जयदीप आपटेच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते. त्यामुळे आता जयदीप आपटे नेमका कुठे आहे, आणि पोलीस त्याला कधी ताब्यात घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे कुटुंबासह पळून गेला असून, मंगळवार दुपारपर्यंत सुरू असलेला त्याचा मोबाइल आता बंद आहे. तसेच कल्याण पश्चिमेमध्ये असणारा त्याचा कारखानाही सध्या बंद आहे. जयदीप आपटे याला भारतीय नौदलाकडून फारसा अनुभव नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील २८ फुटांचा ब्राँझचा पुतळा उभारण्याचे काम देण्यात आले होते. या आपटेने अवघ्या सहा ते सात महिन्यांमध्ये शिवरायांचा हा पुतळा तयार केला होता. विशेष म्हणजे, त्याने बदमाशी करत शिवरायांच्या मस्तकावर कुलकर्ण्याच्या हल्ल्यात महाराजांच्या मस्तकावर जखम झालेली कोरही चितारली होती. या कामापूर्वी जयदीप आपटेला इतके मोठे पुतळे उभारण्याचा कोणताही अनुभव नव्हता. त्यामुळे आपटे याला नेमक्या कोणत्या निकषांच्याआधारे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच काम देण्यात आले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात असून, हा भामटा आपटे शिवप्रेमींच्या निशाण्यावर आलेला आहे.
दरम्यान, या प्रकरणात पुतळ्याचे डिझाईन देणारा चेतन पाटील याने सांगितले, की पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला असला तरी पुतळ्याच्या कामाशी माझा कोणताही संबंध नव्हता, हेच खरे आहे. ज्यावेळी पुरावे सादर करण्याची वेळ येईल, तेव्हा मी ते न्यायालयापुढे सादर करेन. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस त्यांच्या कोल्हापूर स्थित घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी तिथे होत्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पण त्यानंतर पोलिस दुसर्यांदा तिथे गेले तेव्हा चेतन पाटील यांच्या घरी कुणीही नव्हते. त्यांच्या घराला कुलूप होते. त्यामुळे पोलिसांना आल्या पावली परत जावे लागले. आता या दुर्घटनेनंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांनी या पुतळ्याची जबाबदारी नौदलाची असल्याचे सांगत लगेचच हात झटकले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही, ‘पुतळ्याचा आराखडा व उभारणी नौदलाने केली होती. ताशी ४५ किलोमीटर वेगाने खारे वारे वाहत असल्याने पुतळ्याचे नुकसान झाले असावे’, असे सांगत राज्य सरकारला या सगळ्या वादापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा राज्य सरकारने कोणतेही आढेवेढे न घेता याप्रकरणाची शांतपणे हाताळणी केली असती तर अधिक योग्य ठरले असते, अशी भावना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, विरोधीपक्ष यावरुन सरकारवर टीका करत असतानाच संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. ”हा पुतळा घाईगडबडीत उभा केला होता. तसेच हा पुतळा आकारहीन आणि शिल्पशास्त्रास अनुसरुन बनवला नव्हता. त्यामुळे आम्ही हा पुतळा बदलण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केले”. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला यासंदर्भात पत्र पाठवले होते. या पत्राचा फोटोदेखील संभाजीराजे यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. दुसरीकडे, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर याविरोधात बुधवारी मालवण बंदची हाक देण्यात आली होती. मालवणकरांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून, सर्व दुकाने बंद आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रभरात महाविकास आघाडीकडूनही आंदोलन करण्यात येणार असून, मालवणमधील आंदोलनात शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे, अंबादान दानवे, जयंत पाटील, विनायक राऊत, विजय वडेट्टीवार राजकोट किल्ल्यावर जात शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर या नेत्यांकडून भरड नाका ते मालवण पोलीस स्टेशनपर्यंत निषेध मोर्चा काढला जाणार आहे.
——–
मराठा महासंघाचेही राज्यभर आंदोलन
अखिल भारतीय मराठा महासंघाने कोल्हापुरात आज या प्रकरणी आंदोलन केले. त्यांनी शिल्पकार जयदीप आपटे याला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांना दिले. पुण्यातील कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळही महाविकास आघाडीने या प्रकरणी आंदोलन केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात बारामतीतही या प्रकरणी आंदोलन करण्यात आले.
—————