– पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ब्लू प्रिंट तयार; विद्यमान आमदाराने या भागाला वंचित ठेवल्याचा आरोप!
नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – शेवगाव तालुक्यातील प्रस्थापितांच्या कारखाना परिसरात पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. केदारेश्वर परिसराला पाण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट तयार असून, एकदा संधी द्या. या भागातील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावतो, असे प्रतिपादन केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रतापराव ढाकणे यांनी केले. संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाच्या मील रोलरच्या पूजन समारंभात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रभावती ढाकणे, कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे, संचालक डॉ.प्रकाश घनवट, रणजीत घुगे, त्रिंबकराव चिमटे, बाळासाहेब फुंदे, मोहन दहिफळे, तालुका अध्यक्ष हरीश भारदे, कार्यकारी संचालक रमेश गर्जे, पोपटराव केदार, मुख्य अभियंता प्रवीण काळुसे, मुख्या लेखापाल तीर्थराज घुंगरट, रामनाथ पालवे, राजेंद्र केसभट आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ढाकणे म्हणाले, की मागील तीस वर्षांपासून आपण जनतेसाठी अखंडपणे संघर्ष करत आलो आहे. वेळोवेळी जनतेची आपल्याला साथ मिळाली. यावर्षीची लढाई मात्र आरपारची असेल. मला आमदारकीचा हव्यास नाही, मी तुमच्यासाठी लढतोय. कारण बोधेगाव परिसराला पाण्याच्या समस्येपासून कायमचे सोडवायचे आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला तर परिसर उजळतो. लोकांचे जीवनमान उंचावते. त्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी आणण्यासाठी मला पाच वर्षे आमदारकी पाहिजे. शेतीच्या पाण्यासाठी परिसर कसा योग्य आहे, याचा रोड मॅप माझ्याकडे तयार असून, पाच वर्षात या परिसराला जलयुक्त करून टाकू. स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी बोधेगाव परिसरावर अत्यंत प्रेम केले. मात्र मागील पंचवीस वर्षांपासून या परिसरात विकासाचे एकही ठोस काम झाले नाही. केवळ रस्ते झाले म्हणजे विकास होत नाही. मूलभूत विकास काय आहे हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी तुमची साथ अत्यंत महत्त्वाचे आहे. केदारेश्वर कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी अनेकांनी वेळोवेळी प्रयत्न केले, मात्र आपण खंबीरपणे ठाम भूमिका घेऊन शेतकर्यांच्या बाजूने उभे राहिलो असल्याने कारखाना आज व्यवस्थितपणे चालू आहे. एक वेळ माझी संपत्ती गहाण ठेवून मी कारखाना वाचविला. मात्र शेतकर्यांना दुसर्यांच्या दारात जाऊ दिले नाही. कारण हा ऊसतोडणी कामगारांचा कारखाना आहे. यापुढेही आपण सर्वांनी कारखाना वाचविण्यासाठी व पाण्याचा लढा निर्माण करण्यासाठी येणार्या काळात मला साथ द्या, आणि पाणी कसे मिळत नाही हे मी पाहतो. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन श्री ढाकणे यांनी याप्रसंगी बोलताना केले. प्रस्ताविक शरद सोनवणे यांनी तर आभार माजी संचालक अनिल कांबळे यांनी मानले.