– चार दिवसांत शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा राज्यात अभूतपूर्व आंदोलन; तुपकरांचा एकनाथ शिंदे सरकारला इशारा
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्रात चौथ्या आघाडीची स्थापना करत असल्याचे सांगून, विधानसभेच्या २५ जागा लढण्याची घोषणा केली असली तरी, या त्यांच्या चौथ्या आघाडीत अद्याप इतर राजकीय पक्ष किंवा नेते यांनी येण्याबाबत तुपकरांना ठोस असे काहीही सांगितले नाही. त्यामुळे तूर्त एकट्या असलेल्या तुपकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशा प्रकारची चाचपणी मनसेकडून चालू असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. त्यादृष्टीने मनसेच्या काही नेत्यांनी तुपकर यांची भेटही घेतली असून, तुपकरांनी पक्षात येण्यापेक्षा आपण आघाडी करून निवडणूक लढवू, त्यासाठी आपण राज ठाकरे यांच्यासोबत येण्यास तयार आहोत, असे या नेत्यांना कळवले असल्याचेही खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. दरम्यान, कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन व कापूस दरवाढीच्या मागण्यांसाठी लवकरच एक राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल. हे आंदोलन न भूतो न भविष्यति असे असेल, असा इशाराही तुपकर यांनी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला दिला आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसेसोबत यावे, यासाठी मनसेच्या काही नेत्यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेतल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. या भेटीचा अधिकृत तपशील हाती आला नसला तरी, बुलढाणा मतदारसंघातून तुपकरांनी मनसेच्या इंजिन चिन्हावर निवडणूक लढवावी, त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे येतील, तसेच तुपकरांनीही राज ठाकरे यांच्यासोबत राज्यभर प्रचारात उतरावे, असा निरोप तुपकरांना या भेटीत दिला गेला असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. त्यावर तुपकरांनी आम्ही आधीच तिसर्या आघाडीची घोषणा केली असून, मनसे व तिसरी आघाडी सोबत विधानसभेला सामोरे गेली तर त्याचा फायदा होईल. आपण आघाडी करून निवडणूक लढवू, असा प्रस्ताव तुपकरांनी या नेत्यांकडे दिला असल्याचेही हे सूत्र म्हणाले. त्यामुळे तुपकरांच्या या प्रस्तावावर राज ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यानी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण तत्पूर्वीच त्यांना अटक करून पोलिसांनी तुपकरांचे हे आंदोलन उधळून लावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा तुपकरांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला शेतकर्यांच्या मागण्यांसाठी सळो की पळो करून सोडण्याचा इशारा दिला आहे. तुपकर म्हणाले की, मुंबईच्या आंदोलनात आम्ही शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. शेतकर्यांना हक्काचा पीकविमा द्या, कापसाची दरवाढ द्या, विशेषतः सोयाबीन व कापसाच्या दरवाढीसंबंधी केंद्राशी चर्चा करून आयात व निर्यातीचे धोरण ठरवा, अशी आमची मागणी होती. पण सरकारने आमचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. मला अटक झाली. पण त्यानंतरही आमच्या काही कार्यकर्त्यांनी गिरगाव चौपाटीवर आंदोलन केले. आता राज्य सरकारने आमच्या मागण्यांवर २-४ दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा, आगामी काळात कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन व कापूस दरवाढीसह आदी शेतकर्यांच्या मागण्यांसाठी आम्ही लवकरच एक राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहोत. शेतकर्यांचे हे आंदोलन न भूतो न भविष्यति असे असेल. या आंदोलनामुळे राज्यातील सत्ताधारी नेत्यांना फिरणे अवघड होईल, असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे.
रविकांत तुपकर दोन मतदारसंघातून उभे राहणार!
आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर हे दोन मतदारसंघातून उभे राहणार असल्याचीही खात्रीशीर माहिती हाती आली आहे. तसे, संकेतदेखील तुपकरांनी दिलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत तुपकरांना सिंदखेडराजा, चिखली व बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून लीड मिळालेला आहे. यापैकी बुलढाणा व सिंदखेडराजा मतदारसंघात प्रस्थापित नेत्यांच्या विरोधानंतरही तुपकरांना ही मते मिळाली असून, तेथे तुपकरांचा व्होट बेस आहे. या शिवाय, तुपकरांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणता मतदारसंघ सुरक्षीत राहील, यासाठी एक खासगी सर्वेक्षण तसेच कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतली होती. त्यात दोन मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षीत राहतील, असा निष्कर्ष आलेला आहे. त्यामुळे तुपकर हे सिंदखेडराजा व बुलढाणा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात, असेही विश्वासनीय सूत्राने सांगितले आहे.