Breaking newsBULDHANAHead linesLONARSINDKHEDRAJAVidharbha

‘सोयाबीन’ची जोमदार वाढ; शेतकर्‍यांची झोप उडाली!

– युरिया खत टाकू नका, योग्यवेळी फवारणी करा – कृषी विभागाचा सल्ला

बिबी (ऋषी दंदाले) – सतत पडणार्‍या रिमझिम पावसामुळे पावसाने बिबी महसूल मंडळातील सोयाबीन पिकाने जोर धरला असून, कमी कालावधीत सोयाबीन पिकाची जास्तीची वाढ झाल्यामुळे शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. पीक जोमदार वाढले असले तरी, उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असल्याचे परिसरातील दुर्देवी चित्र आहे.
बहरलेले सोयाबीन पीक, कीटकांनी खाललेली सोयाबीन.

बिबी मंडळात सोयाबीन पेरा मोठ्या प्रमाणात झालेला असून, अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकर्‍यांना आहे. बिबी परिसरात मागील महिन्यापासून रिमझिम पाऊस ठिबकप्रमाणे पिकांना पोषक असाच आहे. त्यामुळे जमीन भुसभुशीत झाली असल्यामुळे सोयाबीन पिकाची फक्त वाढ होऊन वेलीप्रमाणे वाढत असल्यामुळे फुल, फळ, शेंगा कमी प्रमाणात दिसत आहेत. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि सूर्यप्रकाश पुरेसा मिळत नसून, ऊन पडत नसल्यामुळे जमीन आटून येत नाही. परिणामी, सोयाबीनची मूळं सरळ जमिनीत चालली असून, पुरेशी फुलधारणा होत नसल्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याच्या चिंतेने शेतकरी कृषी केंद्रावरून वाढ थांबविण्यासाठी औषधी खरेदी करून आणत आहेत. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

सतत पडणार्‍या रिमझिम पावसाच्या सरीमुळे आणि दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी महागडी औषधी फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे. आधीच लोणार तालुका दुष्काळाच्या छायेत असून, दरवर्षी उत्पादनात कमालीची घट होत असल्याने शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार वाढत चालला आहे.
– माधव कांगणे शेतकरी, बिबी
———
सुरुवातीला याहीवर्षी १०० टक्के पाऊस पडणार, बळीराजाला चांगले दिवस येणार अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला होता. मात्र ढग दाटून येतात, पण बरसत नसल्याचे चित्र दिसत आहे. अजूनही दमदार पाऊस बिबी मंडळात झालेला नाही.
– कैलास नरवाडे, शेतकरी बिबी
——–
सध्या सोयाबीन पीक जोमात असून बहरलेले पीक बघून शेतकरी पुढील नियोजन करीत असतो. मात्र वातावरणातील बदलामुळे आणि कीडरोगाच्या त्रासाने महागडे औषधी खते वापरून शेतकर्‍याचे कंबरडे मोडले जात आहे. तुडतुडे, कोकडा मवा, थीम्स असे विविध रोगकिडे मकोडे शेतकर्‍याला सोडायला तयार नाहीत. लावलेला खर्चही मिळतो की नाही या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.
– शिवानंद नागरे, शेतकरी मांडवा
——–
शेतकर्‍यांनी सोयाबीनला युरिया खत टाकू नये. तसेच कीड नियंत्रणासाठी योग्यवेळी कीटकनाशक त्यामध्ये निंबोळी अर्कची फवारणी करावी. फवारणी करतेवेळेस शेतकर्‍यांनी तोंडाला रुमाल, मास्क, हेल्मेट वापरावे. शक्य झाल्यास फवारणी कीटचा वापर करावा.
– कु. कविता साखरे, कृषी सहाय्यक

वातावरणातील बदलामुळे इतरही कीडरोगांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा उलटून दोन महिने झाले तरीही बिबी मंडळातील विहिरी, नदी, नाले, तलाव तहानलेलेच आहेत. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी पुढील रब्बीचे पीकही हाताचे जाण्याची शक्यता नाकारता येत नसून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!