ChikhaliHead linesVidharbha

शेतरस्ता खुला करण्यासाठी महिलांसह शेतकर्‍यांचे तलावाच्या सांडव्यातच उपोषण

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील सोनेवाडी येथे पूर्वपार चालत आलेला शेतरस्ता पाझर तलावाच्या सांडव्यात गेला. तर सांडव्याशेजारची जमीन एका महिलेने अतिक्रमीत केली असून, ही महिला या रस्त्याने शेतकर्‍यांना जाऊ देत नाही. शिवीगाळ करते, खोटे गुन्हे दाखल करते. याप्रश्नी महसूल, पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु, अधिकारी दाद देत नसल्याने व शेतात जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त शेतकरी व महिलांनी कालपासून पाझर तलावाच्या सांडव्यातच उपोषण सुरू केले आहे. रात्रीदेखील हे शेतकरी व महिला उपोषणस्थळी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. जोपर्यंत शेतरस्ता मिळत नाही, तोपर्यंत आंदोलनातून हटणार नाही, अशी कणखर भूमिका शेतकरी व महिलांनी घेतली आहे. हे आंदोलन चांगलेच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली असून, शेतकरी नेते विनायक सरनाईकसह इतर नेते आंदोलनस्थळी धाव घेणार आहेत.

सविस्तर असे, की तालुक्यातील सोनेवाडी येथे १९९३-१९९४ मध्ये झालेल्या पाझर तलावामुळे शेतकर्‍यांचा पूर्वीपार चालत आलेला रस्ता सांडव्यामध्ये गेला. सांडव्या शेजारी असलेली जमीन व सांडव्यातच एका महिलेने अतिक्रमण केले असल्याने शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने सांडव्या शेजारून असलेल्या शासकीय जमिनीच्या सीमानिश्चित करून शेतरस्ता कायमस्वरुपी खुला करून देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी सोनेवाडी येथील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय, चिखली तहसील कार्यालय, जलसंधारण विभाग व महसूल विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु वारंवार पत्र, निवेदने देऊनसुद्धा कारवाई होत नसल्याने शेवटी सोनेवाडी येथील शेतकर्‍यांसह महिलांनी शेतरस्ताबाधीत झालेल्या पाझर तलावाच्या सांडव्यातच काल (दि.१२)पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तायडे, सुधाकर शेळके, अशोक काळे, बबन काळे, विजय पवार, सतीश काळे, प्रकाश तायडे, भास्कर काळे, महादू गुंजकर, शिवाजी जंजाळ, रुस्तम शिरसाट, राजेंद्र पवार, विजय हाडे, शंकर मेहुणकर, समाधान जंजाळ, कस्तुराबाई जंजाळ, जनाबाई काळे, साखरबाई तायडे, सिंधुबाई जंजाळ, कुशीव्रंताबाई शेळके, मंगलाबाई काळे, अलकाबाई शिरसाट, मंगलाबाई काळे, सविताबाई काळे, सुरेखाबाई तायडे आदी शेतकरी व महिला सहभागी झाल्या आहेत.
मौजे सोनेवाडी येथे १९९३-१९९४मध्ये पाझर तलाव करण्यात आला होता. यामुळे पूर्वीपार चालत आलेला सोनेवाडी ते पांगरी शेतरस्ता सांडव्यात गेल्याने सोनेवाडी येथील शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच उरला नाही. विशेष म्हणजे, तलावातील क्षेत्र हे ग्रामपंचायतीच्या नावे असतांना एका महिलेने त्या शासकीय जमिनीवरच अतिक्रमण केले आहे. तर तेथून कुणी गेल्यास शिवीगाळ व मारण्याची धमकी महिला देत असते. सदरचा रस्ता करण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या दोन ते चार वर्षांपासून शेतकरी सतत पाठपुरावा करीत आहेत. या प्रकरणी शेतकर्‍यांवर खोटे गुन्हेसुद्धा महिलेने दाखल केले आहे. यापूर्वी या मागणीसाठी शेतकर्‍यांनी जलसमाधी आंदोलन केले होते. त्यावेळी जलसंधारण विभाग यांनी २० दिवसांचा कालावधी मागवून घेत रस्ता देण्यासह कार्यवाही करण्याचे अश्वासन दिले होते. परंतु वर्ष उलटूनसुद्धा न्याय मिळत नसल्याने ती अतिक्रमीत जमीन ग्रामपंचायतीच्या नावे असूनसुद्धा मोजणी झाली नसल्याने त्या जमिनीच्या सीमा निश्चीत करण्यात याव्यात, पूर्वीप्रमाणे चालत आलेला रस्ता िंकवा पर्यायी रस्ता कायमस्वरुपी खुला करण्यात यावा, सोनेवाडी गावासाठी नवीन तलाठी देण्यात यावा, शेतकर्‍यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, सदर जमिनीची मोजणी तात्काळ करण्यात यावी, पाझर तलावाच्या भिंतीवर झाडे वाढल्याने भविष्यात धोका निर्माण झाला असल्याने तलावाची दुरुस्ती व साफसफाई करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी सांडव्यात उपोषण सुरु करण्यात आले आहे. तर जोपर्यंत प्रश्न निकाली निघणार नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्ते यांनी घेतली आहे.
———

जलसंधारण, महसूल, भूमीअभिलेखला वारंवार पत्रव्यवहार केला तरी कारवाई नाही!

या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तायडे यांच्या माध्यमातून सरपंच, सचिव यांनी मौजे सोनेवाडी येथील शासकीय गट क्र २४७, २२७, व ९ची मोजणी करून जमीन ग्रामपंचायतीला ताब्यात मिळणेबाबत मागणी केली आहे. तसे पत्रव्यवहारसुद्धा यापूर्वीच करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणी करून सीमा निश्चीत करण्याबाबत कार्यवाहीचे आदेशसुद्धा तहसीलदार यांनी दिले आहे. परंतु कार्यवाही होत नसल्याने व रस्ता मिळत नसल्याने शेतकर्‍यांना आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागला आहे. विशेष म्हणजे, रात्रीसुद्धा आंदोलनकर्ते शेतात होते.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!