ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने दोन शासकीय कर्मचार्यांनी स्वखर्चाने केला रस्ता!
– ग्रामपंचायत सरपंच, व ग्रामसेवकाविरोधात गावात संतापाची लाट!
चिखली / मेरा बुद्रूक (एकनाथ माळेकर) – देऊळगावराजा तालुक्यातील पिंपरी आंधळे येथील गावातील रस्ता ते स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता हा प्रचंड खराब झालेला आहे. या रस्त्याने पायी चालणेदेखील कठीण झालेले आहे. हा रस्ता दुरूस्त करण्यासंदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला सांगितले होते. परतुं, निगरगठ्ठ ग्रामपंचायत प्रशासन व सरपंचाने दुर्लक्ष केले. तेव्हा गावकर्यांची ही अडचण पाहाता, तसेच वयोवृद्ध ग्रामस्थ, शाळकरी मुलांचे हाल पाहाता, गावातील रामेश्वर आंधळे बुलढाणा पुलिस व कारभारी डोईफोडे शिक्षक या दोन शासकीय कर्मचारी यांनी स्वखर्चाने हा रस्ता बनविण्याचा निर्णय घेतला, व आजपासून (दि.११) या रस्त्याचे कामदेखील सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या दोघांचे आभार व्यक्त केले असून, ग्रामस्थांसह सचिव व सरपंचांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सविस्तर असे, की देऊळगावराजा तालुक्यातील मौजे पिंपरी आंधळे येथील मुख्य रस्ता ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायतीला वेळोवेळी तोंडी सांगूनसुद्धा ग्रामपंचायतीचे सचिव व सरपंच हे दुर्लक्ष करत होते. तेव्हा गावातील रामेश्वर आंधळे बुलढाणा पोलीस व कारभारी डोईफोडे शिक्षक या दोन शासकीय कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या या समस्येची दखल घेऊन स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता दुरूस्त करण्याचे ठरवले. त्यानुसार, आज (दि.११)पासून मुरूम टाकण्यास सुरूवात झाली. त्यामुळे रस्ता चांगला होत असून, शाळकरी मुले, वृद्ध यांना दिलासा मिळणार आहे. गावातील मुख्य रस्ता ते स्मशानभूमीपर्यंत काम सुरू झाल्यामुळे सर्वात जास्त आनंद शाळेतील मुला-मुलींना झाला आहे. कारण आता १५ ऑगस्ट जवळ आले आहे, आणि या रस्त्यावरून शाळेची प्रभातफेरी निघते. ग्रामपंचायतीने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने सदर प्रकरणी लवकरच बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे काही ग्रामस्थांच्यावतीने तक्रार दाखल केली जाणार असून, ग्रामसेवक व सरपंचांवर कारवाईची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती काही ग्रामस्थांनी दिली आहे.