BULDHANAHead linesVidharbha

जिल्ह्यात २३ नवीन मतदान केंद्रांची भर!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्ह्यात २३ नवीन मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मतदान केंद्रामुळे जिल्ह्यात आता २ हजार २८८ मतदान केंद्र असणार आहे. तसेच कुटुंबातील सर्व मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर असणार आहेत. गत लोकसभा निवडणुकीला जिल्ह्यात २ हजार २६५ आणि १ सहायकारी मतदान केंद्र असे एकूण २ हजार २६६ मतदान केंद्र होती. यात आता २३ नवीन मतदान केंद्राची वाढ होऊन २ हजार २८८ मतदान केंद्र असणार आहेत.

जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार मतदान केंद्रावर निश्चित मर्यादेपेक्षा जास्त मतदार संख्या असल्यास त्या मतदान केंद्रावरील मतदार त्याच इमारतीमध्ये वेगळ्या खोलीमध्ये मतदानकेंद्र स्थलांतरीत करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर समसमान मतदार असणे आवश्यक आहे. त्यानुसार मतदारांच्या सोयीसाठी मतदार संख्या निश्चित करून नवीन मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात २३ मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्र नादुरूस्त, मोडकळीस आले आहेत, अशा मतदान केंद्रांची पाहणी करून दुरूस्ती, तसेच नवीन ठिकाणी मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच निश्चित करण्यात आलेल्या मतदार मर्यादेपेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली आहे. त्याठिकाणी आवश्यकतेनुसार विभागणी, विलीनीकरण करण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये बदल झाले आहेत, अशा मतदान केंद्रांच्या नावामध्ये बदल करण्यात आले आहेत.
सुधारीत, नवीन प्रस्तावाच्या अनुषंगाने विधानसभा आणि जिल्हास्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीमध्ये उपस्थित सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी यांचेकडून सहमती घेवून सदरचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आले. यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नवीन, विलीनीकरण, स्थलांतरण आणि नावात बदल झालेल्या मतदान केंद्रांमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मलकापूर ३०५, बुलढाणा ३३७, चिखली ३१७, सिंदखेडराजा ३४०, मेहकर ३५०, खामगाव ३२२, जळगाव जामोद ३१७ अशी एकूण मतदान केंद्रांची संख्या राहणार आहे. बदल झाल्यानंतर अद्यावत विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदान केंद्रांची यादी सर्व मतदार नोंदणी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध राहणार आहे. या यादीची नागरीकांनी पडताळणी करून मतदानकेंद्राविषयी माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
———

सुधारीत वेळापत्रकानुसार प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध

भारत निवडणूक आयोगाने दि. १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या दुसर्‍या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्धीनंतर सर्व विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्तरावर प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढल्यानंतर अंतिम मतदारयादी दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. २३ जानेवारी ते ६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ३८ हजार ४०४ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. तसेच ६ हजार २३७ मतदारांची नावे वगळली असून १८ हजार ३३१ मतदाराच्या तपशीलामध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. नोंदणी आणि वगळणीनंतर प्रारूप मतदार यादीमध्ये १० लाख ८४ हजार ९३५ पुरूष मतदार, ९ लाख ८९ हजार ३२४ महिला मतदार, ३३ तृतीयपंथी असे एकूण २० लाख ७४ हजार २९२ मतदार आहेत. यात १४ अनिवासी भारतीय, १६ हजार ९६८ दिव्यांग मतदार, तर १८ ते १९ वयोगटातील एकूण ३४ हजार ५८१ मतदार प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!