तब्बल 2200 ब्रास अवैध वाळूसाठा जप्त; जागेवरच लिलाव!
– महसूल, पोलिस, आरटीओच्या अधिकार्यांना वाळूतस्करांचे कंबरडे मोडण्याचे आदेश
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील अवैध वाळूसाठा जप्त करून जागेवरच शासकीय कामासाठी लिलाव करण्यात आले. बुधवार व गुरूवार या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत तब्बल २२०० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्याची कारवाई झाली असून, ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
सिंदखेडराजा येथे अवैध वाळूतस्करांविरुद्ध काल व आज मोठी कारवाई करण्यात आली. यात तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रवीण धानोकर यांनी २२०० ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त केला. जप्त केलेला वाळू साठ्याचा त्याच ठिकाणी लिलाव करण्यात आला. वाळू उपसा करणार्या दोन ट्रॅक्टर यावेळी जप्त करण्यात आल्या. सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मेहकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. दोन दिवसीय कारवाईत बावीशे ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्याची कारवाई ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. खडकपूर्णा नदीपात्र व जलाशयामधून रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत वारंवार प्राप्त होणार्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २२ मेरोजी मौजे डिग्रस बुद्रूक येथील रस्ते तोडण्यासाठी प्रवीण धानोरकर, प्रभारी उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा तथा तहसीलदार सिंदखेडराजा हे पथकासह गेले असता, तेथे अवैध रेतीसाठा आढळून आल्यावरुन अजून शोध घेतला असता, इतरही रेतीसाठे आढळून आले. असा एकूण ५०० ब्रास रेतीसाठा आढळून आल्यावरुन याबाबत ग्रामपंचायत यांना घरकुलासाठी रेती उपलब्ध करुन देण्यासाठी घरकुलाच्या लाभार्थी यांची माहिती मागविण्यात आली असता, याबाबत कोणीही रेतीची मागणी न केल्यामुळे सदर रेतीसाठा चोरी जाण्याची शक्यता असल्यामुळे तेथे रेती घेण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना याबाबत विचारणा केली असता, काही व्यक्ती रेती घेण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना शासकीय दर ६०० रुपये प्रमाणे इतर शुल्कासह ५०० ब्रास रेतीसाठा शासकीय दराप्रमाणे रक्कम प्राप्त करुन घेतल्यानंतर संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला, व सदर रेतीसाठा उचल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानंतर वाहतूक आढळून आल्यास अवैध रेती वाहतूक समजून कारवाई करण्यात येईल, असे सूचित केले. यासाठी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण धानोरकर, तहसीलदार सिंदखेडराजा तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा, उपविभागीय पोलिस अधिकारी, देऊळगावराजा वैशाली डोंगरजाळ, तहसीलदार देऊळगावराजा, विकास पाटील ठाणेदार अंढेरा, ठाणेदार किनगावराजा, महेश भाले शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, देऊळगावराजा, तलाठी नीलेश जाधव, सतिश तायडे व मंडळ अधिकारी के बी इप्प्र आदी हजर होते. अवैध रेती वाहतूक व रेतीसाठ्यांवर कारवाई करण्यासाठी दिनांक २३ मेरोजी जिल्हाधिकारी बुलढाणा हे सकाळी १०.०० वाजता मौजे डिग्रस बु, निमगाव वायाळ येथे येवून दुपारच्या भरउन्हामध्ये पायी फिरुन खडकपूर्णा नदीपात्राची व टाकरखेड वायाळ येथील रेतीडेपोची पाहणी केली. अवैधपणे रेतीउपसा करुन केलेल्या रेतीसाठे जप्त करणेबाबत सूचना दिल्या. त्यानुसार वेगवेगळया ठिकाणी जवळपास १००० ब्रास रेतीसाठा आढळून आल्यावरुन याबाबत ग्रामपंचायत यांना घरकुलासाठी रेती उपलब्ध करुन देण्यासाठी घरकुलाच्या लाभार्थी यांची माहिती मागविण्यात आली असता, याबाबत कोणीही रेतीची मागणी न केल्यामुळे सदर रेतीसाठा चोरी जाण्याची शकता असल्यामुळे तेथे रेती घेण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना याबाबत विचारणा केली असता काही व्यक्ती रेती घेण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना शासकीय दर ६०० रुपये प्रमाणे इतर शुल्कासह ७०० ब्रास रेतीसाठा शासकीय दराप्रमाणे रक्कम प्राप्त करुन घेतल्यानंतर संबधीतांच्या ताब्यात देण्यात आला व सदर रेतीसाठा उचल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली गेली आहे.
त्यांनंतर जिल्हाधिकारी, बुलढाणा, प्रवीण धानोरकर, प्रभारी उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा तथा तहसीलदार सिंदखेडराजा, उपविभागीय पोलिस अधिकारी, देऊळगावराजा, वैशाली डोंगरजाळ, तहसीलदार देउळगावराजा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलढाणा यांच्यासह मौजे चिंखेड येथे भेट दिली असता, अवैध उत्खनन करणार्या बोटी आढळून आल्यास त्या नष्ट करणेबाबत तसेच अवैध वाहतूक करणारे रस्ते खोदून बंद करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या. तसेच आवश्यकतेप्रमाणे एनडीआरएफ पथक व इतर मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सूचित केले. उपप्रादेशिक परीवहन अधिकारी, बुलढाणा यांना विना क्रमांकाचे वाहने व नियमांचे उल्लघंन करणार्या वाहनावर तात्काळ कारवाई करणेबाबत सूचित केले. तसेच खडकपूर्णा जलशयामध्ये बोटी जाप्रâाबादमार्गे पळून गेल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे याबाबत माहिती देवून कारवाई करण्यात येईल, तसेच यांनतरही सिंदखेडराजा तालुक्यामध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली. दिनांक २२ मे व दिनांक २३ मेरोजी एकूण २२०० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. याबाबतचे पंचनामे करण्याची कारवाई सुरूच होती.