– लोकसभेत अखेर शिवसेना फुटली: १२ खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मान्यता, भावना गवळीच पक्षप्रतोद, राहुल शेवाळे गटनेते
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना काढून घेण्यासाठी बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शेवटचा डाव टाकला आहे. मूळ शिवसेना आमच्यासोबत असून, आम्हाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, अशा आशयाचे पत्र शिंदे गटाकडून देशाच्या निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. कालच, लोकसभेत शिवसेनेच्या १२ खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली होती. आता निवडणूक आयोगानेही मान्यता दिली तर मात्र उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना सुटणार असून, धनुष्यबाणही निसटणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारी पडत असल्याचे चित्र आतापर्यंत पुढे आले आहे. शिवसेनेच्या एकूण १९ पैकी १२ खासदारांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलेले आहे. तथापि, दुसरा गट निर्माण न करता ते स्वतंत्र गट म्हणून लोकसभेत बसत आहेत व त्यांच्या पक्षप्रतोदही खासदार भावना गवळीच आहेत. तर अन्य सहा खासदारही आपल्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. त्यापूर्वी विधानसभेतील ४० आमदार, राष्ट्रीय कार्यकारिणी व संघटनेतील प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाजूने वळवलेले आहेत. त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे यांच्याकडून तांत्रिकरित्या शिवसेना ताब्यात घेण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलेले आहे.
राजकीय सूत्राच्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले. शिंदे गटाने लोकसभा खासदारांमध्ये राहुल शेवाळे यांना गटनेते व भावना गवळी यांना मुख्य प्रतोद नेमले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्यावी, अशी विनंती शिंदे गटाने केली आहे. या पत्रावर निवडणूक आयोगाने अद्याप काहीही निर्णय दिलेला नाही.
२०१९ मध्ये शिवसेनेकडे ५६ आमदार होते. पैकी एका आमदाराचे निधन झालेले आहे. त्यामुळे ही संख्या ५५ इतकी होते. ४ जुलैरोजी झालेल्या बहुमत चाचणी परीक्षेत शिंदे गटाच्या बाजूने ४० आमदारांनी मतदान केले होते. कालच लोकसभेतील १९ पैकी १२ खासदारांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांना गटनेते म्हणून मान्यता दिली आहे, तर भावना गवळी यांना मुख्य प्रतोद म्हणून कायम ठेवले आहे. १८ जुलैरोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी जाहीर केली. त्यात एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नेतेपदी नियुक्त करण्यात आले. तर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना कायम ठेवण्यात आलेले आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
12 जानेवारी 1988 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि जून 2019 मध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या गटनेतेपदाबद्दलचा लोकसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य धरण्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या आधारे लोकसभेत शिवसेना गटनेतेपदी राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. आता लोकसभेत शिंदे गट वेगळा स्थापन झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.