बुलढाणा, अकोलासह वंचित बहुजन आघाडीने मागितले २७ मतदारसंघ
– जागावाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक
मुंबई (खास प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे अद्यापही पुढे सरकायला तयार नसून, आज (दि.२८) मुंबईत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत वंचित बहुजन आघाडीने बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा या मतदारसंघांसह २७ मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीकडे सुपूर्त केली आहे. तसेच, जालना येथून मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील व पुणे येथून डॉ. अभिजीत वैद्य यांना कॉमन कॅण्डिडेट म्हणून संधी द्या, अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. ध्येर्यवर्धन पुंडकर यांनी ही माहिती दिली आहे.
आजच्या महत्वपूर्ण बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे प्रमुख चार मागण्या केल्या आहेत. यातील पहिली मागणी ही मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून, तर डॉ. अभिजित वैद्य यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी निवडून आल्यानंतर त्यांचा पक्ष किंवा उमेदवार भाजपमध्ये जाणार नाही, असे लेखी वचन घ्यावे, तसेच किमान तीन अल्पसंख्याक उमेदवारांना उमेदवारी देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. वास्तविक पाहाता, मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वीच आपला कोणत्याही निवडणुकीत रस नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, महाविकास आघाडी काय निर्णय घेते, याकडे त्यांचे लक्ष लागून असावे, असा अंदाज आहे. आजच्या बैठकीत वंचित आघाडीने आपल्या २७ लोकसभा मतदारसंघाच्या नावांची यादीही सोपवली. त्यात, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानबाद (धाराशीव), औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, नांदेड, बुलढाणा, वर्धा या मतदारसंघांचा समावेश आहे.
आज झालेल्या नेत्यांच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीची अंतिम बैठक होणार असून, या बैठकीला शरद पवार व उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीला प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहतील, असेही प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीने कुणाशीही आघाडी नसताना राज्यातील २७ लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. आता यातील काही जागा वगळता इतर जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली जाईल, असे पुंडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.