– अत्यावश्यक सेवा धोक्यात, जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या डोळ्यावर गेंड्याची कातडी!
मेरा बु., ता. चिखली (प्रताप मोरे) – बुलडाणा जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील १०२ च्या रुग्णवाहिका चालकांचे मानधन मागील सहा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे २७ रुग्णवाहिका चालकांवर व त्यांच्या कुंटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हा रुग्णवाहिका सेवा ही अत्यावश्यक सेवा असताना, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कंत्राटदार संस्थेचे बिल थकविल्याने हे चालक पगाराविना उसणउधार करत दिवस काढत आहेत. हे बिले काढण्यासाठी आरोग्य विभागात कुणाला चिरीमारी हवी आहे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात आरोग्य विभागाची रुग्णसेवा बळकट करण्यासाठी, तसेच रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आरोग्य विभागाला शासनाकडून १०२ व १०८ या अत्यावश्यक संपर्क क्रमांकावर तातडीच्या रुग्णसेवा जिल्ह्यात देणे बंधनकारक केलेले आहे. तशी आर्थिक तरतूदही करण्यात आलेली आहे. त्यामध्ये रुग्णवाहिका १०२ ह्या जिल्ह्यात २७ प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २७ रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती लोकसेवा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था औरंगाबाद या संस्थेमार्फत करण्यात आली तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १०२ च्या रुग्णवाहिकेचा ठेका औरंगाबाद येथील संस्थेला देण्यात आला आहे.
या रुग्णवाहिकावरील चालकांना खासगी कंत्राटदाराकडून तुटपुंज्या मानधन तत्वावर नेमले गेले आहेत. परंतु सदर संस्थेला जिल्हा परिषदे (आरोग्य विभाग)कडून मागील ६ महिन्यापासून रुग्णवाहिका चालकांचे बिल मिळाले नसल्याने संस्थेकडूनदेखील रुग्णवाहिका चालकांना ६ महिन्यापासूनचे मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांवर उपासमार ओढवली आहे.
कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रोडवर वाहने चालवून रुग्णांना उपचारासाठी विविध रुग्णालयात घेवून जाण्याचे काम चालकांनी केलेले आहे. या १०२ च्या रुग्णवाहिकेवरील चालकांमुळे अपघातात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले, गरोदर माता, स्तनदा माता व आजारी रुग्ण आदींना तात्काळ सेवा मिळू शकली आहे. तसेच, अनेकांचे जीवही वाचले आहेत. मात्र या चालकांना तुटपुंजे मानधन देवून त्यांची पिळवणूक केली जात आहे. आता तर सहा महिन्यांपासून हादेखील पगार त्यांना मिळालेला नाही. तरीही याच कामावर त्यांचा व त्यांच्या कुंटुबाचा उदरनिर्वाह असल्याने या चालकांवर लेकराबाळांसह उपासमारीची कठीण वेळ आली आहे. अशा रात्रंदिवस सेवा देणार्या चालकांचे मानधन वाढून सरकारी कायम सेवेत रुजू करावे, अशी मागणी या चालकांकडून होत आहे.
—
बुलडाणा आरोग्य विभागात काय सुरु आहे, हा मोठाच प्रश्न निर्माण झालेला आहे. संबंधित संस्थेने आपली बिले सादर करूनही ही बिले काढली जात नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या या रुग्णवाहिका बंद राहण्याचा धोका निर्माण झालेला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या कारभारात लक्ष घालून, त्यांच्या कामाची तपासणी करण्याची गरज आहे.
—————-