बुलढाणा ( संजय निकाळजे) – गावातील दारू बंद करण्यासाठी कव्हळा- सावरखेड येथील ग्रामपंचायतने ठराव घेतला आहे. तसेच अमडापूर पोलीस स्टेशनला धाव घेऊन ठाणेदारांनादेखील निवेदन दिले आहे. आठ दिवसाच्याआत दारू बंद न झाल्यास विलास प्रतापसिंग सुरुसे या युवकाने आत्मदहनाचा तर गावातील युवक, महिला, पुरुषांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कव्हळा सावरखेड येथे अवैद्य गावठी दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे दारुड्यांपासून गावकऱ्यांना व घरातील कुटुंबीयांमधील सदस्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत कव्हळा सावरखेड नजिक गट ग्रामपंचायत ने ९ फेब्रुवारी रोजी क्र.८४ नुसार सर्वानुमते दारूबंदीचा ठराव घेतला आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून गावातील पिण्याच्या पाण्याजवळ व परिसरात दारूचे खराब पाणी वाहत येत आहे. ते पाणी पाझरत आहे. त्यामुळे रोगराई व पोटाचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धरण्याच्या काठाखाली नदी परिसरातील गावठी दारूच्या भट्ट्या कायमस्वरूपी बंद करण्यात याव्या. तसेच ज्यांच्या शेतात दारू पाडली जाते आणि जे दारुपिण्यासाठी आढळतात अशांवर कार्यवाही करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले असून आठ दिवसाच्याआत दारू बंद न झाल्यास विलास प्रतापसिंग सुरुसे या युवकाने आत्मदहनाचा इशारा दिला आहे व गावातील युवक महिला पुरुषांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी उपसरपंच आकाश सुरूसे, सचिव अंभोरे, तंटामुक्ती अध्यक्ष पंडितराव इंगळे, विलास सुरोशे, सुनंदाबाई साळवे, पोलीस पाटील व गावकरी यांची उपस्थिती होती. निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, तहसीलदार चिखली, पंचायत समिती चिखली यांनाही दिल्या आहेत.