चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील शेलोडी येथील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. हे स्नेहसंमेलन विद्यार्थी, विद्यार्थिनींना आपले अंगभूत कलागुण दाखविण्यासाठी चांगली पर्वणी ठरले. पालक, शिक्षकांनीदेखील मुला-मुलींच्या कलागुणांना भरभरून दाद दिली.
शाळेतील स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक पर्वणीच असते. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होते. त्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. असेच सर्वोत्तम उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली शाळा म्हणजे जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च प्राथमिक शाळा शेलोडी होय. शेलोडी ( ता. चिखली ) येथील जिल्हा परिषदेतील शाळेमध्ये सुध्दा विद्यार्थ्यांच्या कला सादर करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपान घाडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून गजानन रिंढे सर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ओम जय जगदीश या आरतीने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यानी भारतीय संस्कृती, देशभक्तीपर गीत, सण उत्सव व लोककला , शेतकरी नृत्य, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान, बालमृत्यू, मोबाईल वापराचे दुष्परिणाम, बेटी बचाओ बेटी पढाओ, पाणी अडवा पाणी जिरवा, हागणदारी मुक्त गाव, विज बचत, व्यसनमुक्ती, सिनेगीतांवरील नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
लहान मुलांची अभिनय क्षमता पाहून पालकांनीदेखील उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री लंके सर , शिक्षक शेळके सर , प्रदिप रिंढे सर, देशमुख सर, सावळे सर, जाधव सर, जयशेट्टे सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू नेमाने व सदस्यांनी कष्ट घेतले तर कार्यक्रमासाठी अमोल नेमाने यांनी निशुल्क मंडप डेकोरेशन व दर्जेदार साउंड सिस्टीम उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव सर आणि देशमुख सर यांनी तर आभारप्रदर्शन प्रदीप रिंढे सर यांनी केले.
बुलढाण्याचे राजकारण मुद्द्यावरून गुद्द्यावर!